कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : वेदगंगा नदीला महापूर आल्यामुळे नानीबाई चिखली ता. कागल येथे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गावाला भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. गावाच्या पश्चिमेकडील बायपास रस्त्याकडून पाणी शिरलेल्या भागासह चावडी गल्ली शेजारच्या कौलगे रस्त्यावरील नानीबाई चिखली वेस परिसराची पाहणी त्यांनी केली. त्यांनी येथील विद्यामंदिर शाळेत असलेल्या निवारा केंद्राला भेट देऊन महापूरग्रस्तांच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रशासनाला सूचना दिल्या की, महापुरामुळे पाणी शिरलेल्या घरांचे आणि पडझड झालेल्या घरांचे तातडीने पंचनामे करा. तसेच नुकसान झालेल्या शेतीचेही पंचनामे तातडीने करुन नुकसान भरपाई तातडीने द्या. यावेळी प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, तहसीलदार अमरदीप वाकडे, जिल्हा कृषी अधीक्षक अरुण भिंगारदिवे, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य सदाशिव तुकान, सरपंच अल्लाबक्ष सय्यद, ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल नुल्ले, विवेक गवळी, बाबुराव वाडकर, वैभव गळतगे, बाळू भोसले, शहाजी कोंगनुळे, अनिल शेट्टी, शीतल शेट्टी, सुभाष स्वामी आदी प्रमुखांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***