जिल्ह्यातील विकासकामे गतीने पूर्ण करण्यासह योजना प्रभावीपणे राबवा – पालकमंत्री गिरीष महाजन

धुळे, दिनांक 28 जुलै, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील रस्ते, सिंचन, विद्युत तसेच इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत कामांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेऊन जिल्ह्यातील विकासकामे प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी आज दिलेत.

आज धुळे जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. यावेळी पालकमंत्री श्री. महाजन बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. धरती देवरे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार ॲड. गोवाल पाडवी, आमदार जयकुमार रावल, आमदार कुणाल पाटील, आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळा गावित, आमदार फारुख शाह, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री गिरीष महाजन म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनांतर्गत सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना, अनुसूचित जाती विशेष घटक कार्यक्रमातंर्गत यावर्षी 469 कोटी 56 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गत वर्षांपेक्षा जवळपास 47 कोटी रुपयांचा अधिकचा निधी जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी यावर्षी प्राप्त झाला असल्याने  या निधीतून जिल्ह्यातील रस्ते, सिंचन, विद्युत तसेच अन्य विभागाच्या योजनेसाठी  तांत्रिक मान्यता घेवून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करुन 15 ते 20 दिवसात कामे सुरु करावीत. विद्युत वितरण कंपनीने प्रत्येक तालुक्यात नविन ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. राज्य शासनाने कृषी पंपधारकाना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौरऊर्जा तसेच प्रधानमंत्री कुसूम योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सौरकृषी पंपाचे वाटप करावे. ज्या ठिकाणी नविन विहीरीचे कामे पुर्ण झाली आहेत अशा ठिकाणी जलदगतीने नवीन जोडणी द्यावी. वलवाडी शिवारात नकाणे तलावातून वाहून येणारे पाणी निचरा करण्यासाठीचा प्रस्ताव त्वरीत सादर करावा. महानगरपालिकेत समावेश झालेली 11 हद्दवाढ गावातील नागरीकांना रस्ते, गटारी, पथदिवे या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. धुळे शहरास दररोज पाणीपुरवठा तसेच सिंचनासाठी अक्कलपाडा धरणाची पाणी क्षमता वाढविण्यासाठी  प्रयत्न करावेत. शिंदखेडा व दोंडाईचा नगर पालिकांच्या प्रलंबित विविध विकासकामांना त्वरीत प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगल्या प्रकारची दर्जेदार रस्ते तयार करावेत. पोलीस विभागाने धुळे जिल्ह्यातील अंमलीपदार्थ विक्रेत्यांवर कोंबीग ऑपरेशन करावेत. तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गुन्हेगारांवर  एमपीडीएअंतर्गत कार्यवाही करावी. असे निर्देशही पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले.

पालकमंत्री श्री.महाजन म्हणाले की, राज्य शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना ,मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अशा अनेक महत्वाच्या योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या विविध योजनांचा धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ  घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्हा वार्षिक योजनेत सन 2023-2024 या वर्षांत प्राप्त झालेला निधी व खर्च याची माहिती दिली. तसेच सन 2024-2025 या वर्षांत जिल्हा वार्षिक योजनेमधील मंजुर नियतव्ययापैकी किमान 25 टक्के निधी जिल्हा विकास आराखडय़ासाठी निश्चित केला असून याअंतर्गत जिल्हा वार्षिक कृती आराखडा निश्चित केल्यानुसार विविध विभागामार्फत नाविण्यपूर्ण कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांनी  जिल्हा वार्षिक योजनेची माहिती दिली. या बैठकीत खासदार, आमदार तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांनी चर्चेत सहभाग घेवून येणाऱ्या अडचणी अध्यक्षांसमोर मांडल्या. बैठकीस जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते रोव्हर मशिनचे वितरण

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आलेले रोव्हर मशिनचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते  आज करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिनव गोयल, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा आप्पती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी  दत्तात्रय वाघ महापालिकेचे अग्निशमन अधिकारी दुष्शत महाजन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

धुळे जिल्ह्यात एकुण चार तालुक्यांमध्ये सन २०२३-२४ मध्ये एकुण १५ रोव्हर मिशन खरेदीस १ कोटी ६७ लाख ८५ हजार रुपये मंजूर केले होते. त्या मंजूर निधीतून धुळे जिल्ह्यात ऑनलाईन ई-मोजणी व्हर्जन 2.0 प्रक्रिया करण्यासाठी घेण्यात आले आहे. या रोव्हरच्या माध्यमातून जीआयएस बेस मोजणी काम रियल कॉर्डीनेटच्या आधारे केले जाणार आहे. धुळे जिल्ह्यात रोव्हरच्या माध्यमातून आजपावेतो १ हजार ८६८ प्रकरणे मोजणी करण्यात आली असून या यंत्रामुळे जमिनीची अचूक मोजणी होत असून प्रशासकीय गतीमानतेत वाढ होणार आहे. यापूर्वी देखील 10 रोव्हर मशिन जिल्हा नियोजन समितीमार्फत घेण्यात आले आहे.

पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते 6 आपत्कालीन फायर बाईकचे वितरण

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वनविभाग यांच्यामार्फत दाट वस्तीच्या ठिकाणी अथवा छोट्या स्वरूपातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 6 फायर बाईकचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापनाची तात्काळ प्रतिसाद यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टिने या फायर बाईक अत्यंत परिणामकारक ठरणार असून या बाईकवर २०० लिटर पाण्याचे २ टॅंक अथवा केमिकल आगीवर नियंत्रणासाठी लागणारे २०० लिटर लिक्विड फोमचे टॅंक असणार आहे. आज येथे वितरित करण्यात येत असलेल्या फायर बाईकपैकी शिरपूर नगरपरिषदेला 2, दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेला 2 तसेच धुळे महापालिकेस 2 फायर बाईक वितरीत करण्यात आल्या.

000