लातूर, दि. 28 : राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून लातूर जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी सुसज्ज अग्निशमन दुचाकी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या दुचाकींचे लोकार्पण राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाले.
आमदार विक्रम काळे, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, अग्निशमन अधिकारी विशाल आलटे, कैलास सोनकांबळे यावेळी उपस्थित होते.
वॉटर मिस्ट फायर एक्सटिंग्युशर मोटर बाईक आणि कॉम्प्रेस्ड एअर फोम बाईक अशा दोन प्रकारच्या अग्निशमन दुचाकी प्राप्त झाल्या आहेत. अरुंद रस्ते, गल्ली-गोलातील जागी, तसेच झोपडपट्टीच्या ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने पोहचू शकत नाहीत. अशा ठिकाणी या अग्निशमन दुचाकी सहज पोहचू शकतात व भडकणाऱ्या आगीवर 3 मीटर ते 12 मीटर अंतरावरून तसेच 30 फूट उंचीपर्यंत फवारा मारू शकतात. यामध्ये पाण्यासोबत रासायनिक फोमचा देखील वापर केल्यामुळे आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविणे सहज होणार आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपरिषदेस 4, अहमदपूर नगरपरिषदेस 2, औसा आणि निलंगा नगरपरिषदेस प्रत्येकी एक आणि रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, जळकोट, चाकूर नगरपंचायतीस प्रत्येकी एक अशा एकूण 13 वॉटर मिस्ट बाईक्स राज्य शासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत. यापैकी सहा दुचाकींचे लोकार्पण पालकमंत्री ना. महाजन आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.