पुणे शहरातील पूरग्रस्त भागाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली भेट

पुणे, दि. २९ : पुणे शहरात २५ जुलै रोजी  झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील नदीकाठची कुटुंबे पुराच्या पाण्यामुळे बाधित झाली आहेत. प्रशासनाने पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकर करून त्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी पुणे महानगरपालिकेत आपत्ती निवारण उपाय योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, उपायुक्त महेश पाटील, गणेश सोनुने, माधव जगताप, अनिरुद्ध पावसकर, नंदकिशोर जगताप आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठी राहणाऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरबाधित क्षेत्रातील नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात. या भागात स्वच्छता करण्यासोबतच नागरिकांना अन्न, स्वच्छ पाणी देण्याची सोय करावी. या परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करावा. अन्नधान्य खराब झाले असल्यास  धान्य वितरणाची सोय करावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरीता पुराच्या पाण्यात खराब झालेले किंवा वाहून गेलेले दाखले, पुस्तके, वह्या उपलब्ध करून द्यावेत. तसेच विद्यार्थ्यांच्या शाळेत तसे कळवावे.

महापालिकेने बाधित क्षेत्रात पूर्ण वेळ मदत कक्ष सुरू ठेवावा. आपत्ती व्यवस्थापनानुसार मदतीची कार्यवाही तत्काळ होणे गरजेचे आहे. बाधित ठिकाणचा चिखल तात्काळ हटवावा त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करावे. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्याची अडचण येत असेल तर टँकरची व्यवस्था करावी. स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गम बुटांचा पुरवठा करावा. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांना आवश्यक सहकार्य करावे. पुराच्या पाण्यामुळे काही दुकानांचेही नुकसान झाले आहे. त्यांचेही पंचनामे करून नुकसान भरपाईची प्रक्रिया करावी.

लवासामध्येही काही ठिकाणी दरड कोसळून नुकसान झाले आहे. त्याचा अहवाल पीएमआरडीएने सादर करावा. धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्याकरीता विसर्ग करण्यापूर्वी नागरिकांना पूर्वसूचना देणे गरजेचे आहे. जलसंपदा विभाग, महसूल, महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांनी समन्वयाने कामे करावीत. नागरिकांची आरोग्य तपासणी करावी. रोगराई नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी आयुक्त श्री. भोसले आणि श्री. सोनुने यांनी बाधित क्षेत्रात पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी साधला पाटील इस्टेट येथील बाधित नागरिकांशी संवाद

तत्पूर्वी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाटील इस्टेट मधील बाधित नागरिकांशी संवाद साधून नुकसाणीची माहिती घेतली. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, या ठिकाणी नदीकाठच्या घरांचे नुकसान खूप झाले आहे. येथील बाधित नागरिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करावेत. नागरिकांचे दाखले, कागदपत्रे लवकर देण्याची कार्यवाही करावी. तसेच महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळण्याकरता प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा उपायुक्त गणेश सोनुने यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

0000