‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलेला लाभ द्यावा – मंत्री दादाजी भुसे

RAJU DONGRE Mantralay Mumbai

मुंबई, दि.३० : नाशिक जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेत एकही पात्र महिला लाभार्थी योजनेपासून वंचित राहता कामा नये, स्थानिक प्रशासनाने घरोघरी पोहचून सर्व पात्र महिलांची नोंद करावी अशा सूचना नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भुसे यांच्या जंजिरा या शासकीय निवासस्थानी येथे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी या बैठकीला आमदार हिरामण खोसकर, दिलीप बनकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा यासह सर्व तहसीलदार, महिला व बालविकास अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.भुसे म्हणाले की, स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यातील प्रत्येक योजनेसाठी महिलेची माहिती भरून घ्यावी. ज्या ठिकाणी लाभार्थी शिबीरामध्ये येवू शकत नाही त्या ठिकाणी ‘नारी दूर ॲप’च्या माध्यमातून माहिती भरण्याबाबत लाभार्थ्यांना सहकार्य केले जावे. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात सर्व कार्यान्वयीन यंत्रणांच्या माध्यमातून अर्ज काटेकोरपणे भरले जावेत यासाठी काळजी घ्यावी. तसेच जे अर्ज मराठीतून भरले आहेत ते इंग्रजीमध्ये भरले जावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत १ ते ३० जुलै २०२४ या कालावधीत पेठ-१८९३, नाशिक-१५३९०२, सिन्नर-४३०२५,दिंडोरी-४८३६७, सुरगाणा-२८७१२, त्र्यंबकेश्वर-२३४८८, निफाड-६०४३३, इगतपुरी-२७२५५, चांदवड-३२५३०, देवळा-१७०६०, नांदगाव-२८८३९, मालेगाव-९३४६२, बागलाण-३८२२०, येवला-३२००८, कळवण-२७०४४ असे एकूण ६,७२,५५८ इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. उर्वरित पात्र महिलांनी अर्ज लवकरात लवकर भरावेत यासाठी प्रत्येक तालुक्यातील लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रशासन यांनी लाभार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना मंत्री श्री.भुसे यांनी केल्या.

०००

संध्या गरवारे/विसंअ