मुंबई, दि. 31 : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली.
राज्यपालांच्या पत्नी श्रीमती सुमथी आर., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मंत्रिमंडळ सदस्य, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांचे कुटुंबीय आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यपालांच्या नियुक्तीबाबतचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आदेश वाचून दाखवला. शपथ सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा संक्षिप्त परिचय
श्री सी. पी. राधाकृष्णन यांनी दि. 31 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते झारखंडचे राज्यपाल होते. आपल्या राज्यपाल पदाच्या कालावधीत त्यांनी तेलंगणा राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून देखील अतिरिक्त कार्यभार सांभाळला.
श्री. राधाकृष्णन हे चार दशकांपासून तामिळनाडूचे राजकारण तसेच सार्वजनिक जीवनातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व राहिले आहे. त्यांचा जन्म 4 मे 1957 रोजी तिरुपूर, तमिळनाडू येथे झाला आणि त्यांनी व्यवसाय प्रशासनात पदवी प्राप्त केली. सन 1998 मध्ये ते पहिल्यांदा कोईम्बतूरमधून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1999 साली ते तेथूनच पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून गेले.
आपल्या खासदारकीच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी वस्त्रोद्योग संबंधी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. सार्वजनिक उपक्रमांसाठी (पीएसयू) संसदीय समितीचे आणि अर्थ विषयक संसदीय सल्लागार समितीचे देखील ते सदस्य होते. स्टॉक एक्स्चेंज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संसदीय विशेष समितीचे देखील ते सदस्य होते.
सन 2004 मध्ये श्री.राधाकृष्णन यांनी संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. तैवानच्या दौऱ्यावर गेलेल्या पहिल्या भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे देखील ते सदस्य होते.
सन 2016 मध्ये श्री. राधाकृष्णन यांची कॉयर बोर्ड, कोचीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे पद त्यांनी चार वर्षे सांभाळले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील कॉयरची निर्यात 2532 कोटी रुपये या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली.
दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी श्री. राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या पहिल्या चार महिन्यांतच त्यांनी झारखंडमधील सर्व 24 जिल्ह्यांना भेटी दिल्या तसेच नागरिक आणि जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आपल्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळात त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल पदाचा देखील काही काळ अतिरिक्त कार्यभार सांभाळला.
उत्तम क्रीडापटू असलेले राधाकृष्णन हे टेबल टेनिसमध्ये कॉलेज चॅम्पियन होते तसेच ते लांब पल्ल्याचे धावपटू होते. क्रिकेट आणि व्हॉलीबॉलमध्ये त्यांना रुची आहे.
श्री. राधाकृष्णन यांनी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल, नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, फिनलंड, बेल्जियम, हॉलंड, तुर्की, चीन, मलेशिया, सिंगापूर, तैवान, थायलंड, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात, बांग्लादेश, इंडोनेशिया आणि जपान या देशांना भेटी दिल्या आहेत.
000
बी.सी.झंवर/विसंअ
राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांचे मुंबईत स्वागत
राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे आज मुंबईत आगमन झाले. यावेळी मुंबई विमानतळ येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव मिलिंद हरदास उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यांनतर राज्यपाल श्री. राधाकृष्णन राजभवनकडे रवाना झाले.
०००