मुंबई, दि. 31 :- भारत आणि इस्त्रायल यांना दोन हजार वर्षांचा समृध्द असा इतिहास लाभला आहे. दोंन्ही देश एकच वेळेस स्वतंत्र झाले. इस्त्रायलने अल्पावधीत विविध क्षेत्रात केलेली प्रगती उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
इस्रायलच्या स्वतंत्रता दिनानिमित्त हॉटेल सेंट रेजिस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलोन, वाणिज्य दूत कोबी शोष्णय, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारत आणि इस्त्रायल यांनी आपापली संस्कृती जपली आहे. ज्यू बांधवांनी वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जात विज्ञान आणि तंत्रज्ञानात केलेली प्रगती शिकण्यासारखी आहे. दोन्ही देशांची मुळे खोलवर रुजलेली आहेत. इस्त्रायलमधून अनेक ज्यू बांधव भारतात स्थलांतरित झाले. त्यापैकी काही महाराष्ट्रात आले. ते येथील संस्कृतीत मिसळून गेले. ते चांगल्यापैकी मराठी बोलतात. भारत आणि इस्त्रायल यांच्यातील संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महानगरपलिका आयुक्त श्री. गगराणी म्हणाले की, इस्त्रायलने संघर्षपूर्ण परिस्थितीतून स्वतःचा विकास केला. आज इस्त्रायलने विज्ञान आणि तंत्रज्ञानात बजावलेली कामगिरी उल्लेखनीय आहे
महाराष्ट्र आणि इस्त्रायल यांच्यात विशेष नाते आहे. कोकण भागात बेने इस्त्रायल या नावाने ज्यू बांधव ओळखले जातात. भारत आणि इस्त्रायल यांच्यातील संबंध आणखी वृद्धिंगत होतील, असा विश्वास व्यक्त केला.
अपर मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर म्हणाल्या की,भारत आणि इस्त्रायल यांच्यात दोन हजार वर्षापासून संबंध आहेत. इस्त्रायल मधील काही ज्यू बांधव स्थलांतरित होऊन कोकणात स्थायिक झाले. ते विविध क्षेत्रात सक्रिय आहेत. भारत आणि इस्त्रायल यांच्यात व्यापारी संबंध चांगले आहेत. भारताच्या अमृत काळात हा व्यापार आणखी वाढेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच इस्त्रायलला भेट दिली आहे.
श्री. गिलोन यांनी सांगितले की, भारत आणि इस्त्रायल यांच्यातील परस्पर संबंध अतिशय चांगले आहेत. भारताची आर्थिक क्षेत्रातील प्रगती कौतुकास्पद आहे. भारताच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे त्यांनी कौतुक केले.
वाणिज्य दूत श्री. कोबी यांनी मनोगत व्यक्त करताना इस्त्रायलच्या इतिहासाबरोबर इस्रायलने कृषी, विज्ञान – तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीची माहिती दिली. तसेच त्यांनी भारत आणि इस्त्रायल यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंधांना उजाळा दिला. यावेळी कला, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
०००००
गोपाळ साळुंखे/विसंअ