मुंबई दि. 1 : आशियाई विकास बॅंकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाच्या कामकाजासंदर्भात आढावा घेण्यासाठी आशियाई विकास बॅंकेचे शिष्टमंडळ दौऱ्यावर आले होते. या शिष्टमंडळामध्ये आशियाई विकास बॅंकेचे वरिष्ठ संचालक क्यूंगफेंग झॅंग, देशातील मुख्यालयाच्या प्रमुख मिओ ओका तसेच यास्मिन सिद्दीकी, ताकेशी यूएडा, अलेक्सीया मायकेल्स, नारायण अय्यर, विकास गोयल, कृष्णन रौटेला, राघवेंद्र एन. यांचा समावेश होता.
मुंबई येथे झालेल्या प्रकल्पाच्या आढावा सभेदरम्यान, मॅग्नेट संस्थेचे अध्यक्ष तथा सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी सन 2021 पासून महाराष्ट्राच्या फलोत्पादन मूल्यसाखळी विकासासाठी कार्यरत मॅग्नेट प्रकल्पाची प्रगती व भविष्यातील नियोजन याबाबत आशियाई विकास बॅंकेच्या शिष्टमंडळास माहिती दिली. प्रकल्पाच्या प्रगतीबाबत शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले.
फलोत्पादन क्षेत्र व उत्पादनामध्ये महाराष्ट्र देशातील अग्रेसर राज्य आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांचे दृष्टीने फलोत्पादन क्षेत्राचा विकास ही महत्वाची बाब आहे. राज्यातील फलोत्पादन क्षेत्रातील कृषी व्यवसायाला चालना देणेकरीता महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प आशियाई विकास बॅंक यांचे आर्थिक सहकार्याने तसेच सहकार व पणन विभागामार्फत मॅग्नेट सोसायटीच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पामध्ये शेतक-यांची क्षमता विकास करणे, फलोत्पादन व फुल पिकांची गुणवत्ता तसेच उत्पादन वाढ करणे व साठवणूक तसेच प्रक्रियेसाठी पायाभूत सुविधा उभारणी करणे या बाबींचा समावेश आहे. मॅग्नेट प्रकल्पांतर्गत डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची (हिरवी व लाल), आंबा , काजू, पडवळ, लिंबू व फुलपिके या फलोत्पादन पिकांच्या उत्पादन ते ग्राहकांपर्यंत वितरण अशा एकात्मिक मूल्य साखळ्यांचा विकास करण्यात येत आहे.
प्रकल्पांतर्गत विकसीत करण्यात येत असलेल्या एस.आर.पी.ओव्हरसीज, नवी मुंबई या प्रकल्पास दि.30 जुलै 2024 रोजी शिष्टमंडळाने भेट देवून तेथील सुविधांची पाहणी केली. फळे व भाजीपाला व इतर कृषिमाल निर्यातीसाठी हा प्रकल्प महत्वाचा असुन प्रकल्प उभारणीदरम्यान आशियाई विकास बॅंकेचे पर्यावरणीय व सामाजिक निकष पूर्तता होत असलेबाबत शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले.
वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्ट्यिूट ऑफ को-ऑपरेटीव्ह मॅनेजमेंट, पुणे येथे झालेल्या चर्चासत्रामध्ये, या शिष्टमंडळाने मॅग्नेट प्रकल्पांतर्गत लाभार्थी शेतकरी उत्पादक संस्था व मूल्य साखळी गुंतवणुकदार यांचेशी वार्तालाप करताना त्यांना प्रकल्प अंमलबजावणी दरम्यान आलेले अनुभव, लाभार्थ्यांच्या सूचनांवर चर्चा करुन कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करावेत अशी सूचना क्यूगफेंग झॅंग, वरिष्ठ सेक्टर डायरेक्टर, कृषि,अन्न,निसर्ग आणि ग्रामीण विकास सेक्टर कार्यालय, आशियाई विकास बॅंक यांनी केली.
वित्तीय संस्थांमार्फत कर्ज पुरवठा याबाबत प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या बॅंक ऑफ इंडिया, मे. समुन्नती फायनानशिएल इंटरमेडीएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड व मे. फेडरल बॅंक या तीन वित्तीय संस्थांना 158 कोटी रुपये कर्जस्वरुपात वितरीत करण्यात आलेले आहेत. या संस्थांमार्फत राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था व मूल्य साखळी गुंतवणुकदार यांना सवलतीच्या व्याजदरात खेळते भांडवल व मध्यम मुदत कर्जाच्या स्वरुपात वित्त पुरवठा करणेत येत आहे. संबंधीत वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी देखील या चर्चासत्रास उपस्थित होते.
या शिष्टमंडळाच्या भेटीदरम्यान प्रकल्प संचालक विनायक कोकरे तसेच डॉ.अमोल यादव, अतिरीक्त प्रकल्प संचालक, मॅग्नेट प्रकल्प यांनी राज्यातील फलोत्पादन क्षेत्रामध्ये मॅग्नेट प्रकल्पाचे माध्यमातून झालेल्या कामकाजाबाबत शिष्टमंडळास इत्यंभूत माहिती दिली. मॅग्नेट प्रकल्प अंमलबजावणी सहाय्य सल्लागार संस्था मे.ग्रॅंण्ट थॉर्टन चे संचालक चेतन भक्कड हे देखील या दौ-यावेळी सहभागी झाले होते.
00000
दत्तात्रय कोकरे/विसंअ