मुंबई, दि. १ : महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे (दुसरा) वेळापत्रक निश्चित केले होते. त्यात भारत निवडणूक आयोगाने बदल केला आहे. त्यानुसार सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्विरित्या पार पडल्यानंतर, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने त्यांचे दि. 20 जून, 2024 रोजीच्या पत्रान्वये दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकाच्या आधारावर राज्यात मतदारयाद्यांचा “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा)” बाबतचे वेळापत्रक निश्चित केले होते.
मात्र, भारत निवडणूक आयोगाने दि. १ ऑगस्ट २०२४ रोजीच्या पत्रान्वये कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केला असून, सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे, तो असा : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदार यादी/ मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे इ., आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे तसेच, अस्पष्ट/ अंधूक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाचे छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग / भागांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांची पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे, कंट्रोल टेबल अद्ययावत करणे, नमुना १-८ तयार करणे, १ जुलै, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रीत प्रारूप यादी तयार करणे – २५ जून ते ५ ऑगस्ट २०२४. एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे- ६ ऑगस्ट २०२४. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- ६ ते २० ऑगस्ट २०२४.
विशेष मोहिमांचा कालावधी – शनिवार १०, रविवार ११, शनिवार १७, रविवार १८ ऑगस्ट २०२४. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत सर्व शनिवार व रविवार. दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई- २९ ऑगस्ट २०२४. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे- ३० ऑगस्ट २०२४.
०००००
गोपाळ साळुंखे/स.सं