नाशिक, दिनांक 1 ऑगस्ट, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा): नाशिक- मुंबई महामार्गावरील रस्त्यांच्या कामांसह इतर अनुषंगिक कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येवून, येत्या दहा दिवसांच्या कालावधीत कामे पूर्ण करण्याच्या सुचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी बैठकीत दिल्या.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात नाशिक- मुंबई राष्ट्रीय महामार्गाबाबत शहरातील विविध संघटनांसमवेत झालेल्या बैठकीत पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, पावसामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनधारकांना प्रवास करतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच यामुळे वाहतुकीची कोंडीही होत आहे. नाशिक ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी नियमित वेळेपेक्षा दुप्पट वेळ लागत आहे. त्यामुळे या महामार्गाच्या दुरूस्तीची कामे येत्या दहा दिवसांत पूर्ण करण्यात यावे व या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या बैठकीत दिले.
विविध संघटनांच्या पदाधिकारी यांनी या बैठकीत नाशिक-मुंबई महामागा्रवरील खड्ड्यामुळे वाहतुकीस येणाऱ्या अडचणी सांगितल्या. तसेच रस्ता दुरूसत होईपर्यंत रस्त्याचा टोल घेवू नये, अशी मागणी देखील यावेळी त्यांनी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली.
00000000
Home Uncategorized नाशिक-मुंबई महामार्गावरील रस्त्यांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत : पालकमंत्री दादाजी भुसे