पीएम किसान कार्ड, रेल्वेचे प्रलंबित प्रकल्प तात्काळ मिशन मोडवर पूर्ण करावेत – केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे

0
10

जळगाव दि. 3 ( जिमाका )  – जिल्ह्यात पीएम किसान कार्डचे 4 लाख 33 हजार 55 एवढे लाभार्थी असून उर्वरित कार्ड देण्यात ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर कराव्यात. जिल्ह्यात रेल्वेकडून अनेक कामे अपूर्ण असून ती मिशन मोडवर पूर्ण करावीत असे निर्देश देऊन जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या ज्या योजनांची कामे प्रलंबित आहेत, त्याची यादी आपल्याला द्यावी त्याचा पाठपुरावा आपण करणार असल्याचे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित ‘दिशा ‘ (जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती ) च्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी खा. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, ग्रामीण विकास प्रकल्पाचे संचालक आर. एस. लोखंडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.  रेल्वे विभागाकडून अमृत भारत स्टेशन योजना सुरु असून यात रावेर, सावदा, मलकापूर, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव स्टेशन मध्ये विविध कामे सुरु आहेत, ते गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी दक्षता घ्यावी तसेच जिथे रेल्वे लाईनच्या खालून रस्ते आहेत त्याची उंची वाढविण्यासाठी तसेच जे रेल्वे लाईन वरूनचे ब्रिज आहेत तेही पूर्ण करावेत. जिथे काही अडचणी असतील ते सांगाव्यात त्याचा पाठपुरावा करून प्रश्न सोडविला जाईल. हे प्रश्न लोकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहेत. त्यामुळे यावर तत्काळ कार्यवाही करावी असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी दिले.

जळगाव विमानतळावरून सध्या मुंबई, पुणे, हैद्राबाद आणि गोवा येथे विमान सेवा सुरु असून आता पर्यंत 18, 865 एवढ्या प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. या सेवेला उत्तम प्रतिसाद असून याच्या वेळेत बदल केला तर अजून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. अहमदाबाद आणि बेंगलोरसाठी नवीन विमान सेवा सुरु करण्याचे प्रस्तावित असून यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहितीही केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी यावेळी दिली. जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा संदर्भात बऱ्याच गोष्टी प्रलंबित असल्याबाबत  खा. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. संजय सावकारे यांनी प्रश्न उपस्थित केले. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांच्याशी चर्चा करून तात्काळ यातून मार्ग काढू अशी ग्वाही देऊन जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प, अटल भूजल योजना, एकात्मिक वीज वितरण क्षेत्र योजना, दीप नगर येथील नवा प्रकल्प याचा आढावा घेवून शेतकऱ्यांना सोलरवरून मुबलक वीज मिळावी म्हणून सुरु केलेली प्रधानमंत्री कुसुम योजनेला जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद असून कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना श्रीमती खडसे यांनी यावेळी दिल्या.

बीएसएनएलच्या टॉवर अपग्रेड करण्याचे काम सुरु असले तरी लोकांना गुणवत्तापूर्ण सेवा मिळते आहे का याबाबतची खात्री करावी, तांत्रिक अडचणी असतील तर वरिष्ठ स्तरापर्यंत सांगाव्यात आणि लोकांना उत्तम सेवा उपलब्ध करून द्यावी. पिक विम्याच्या संदर्भात फेरतपासणी करून शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा अशा सूचना यावेळी  केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केल्या. यावेळी खा. स्मिताताई वाघ, आ. सुरेश भोळे, आ. संजय सावकारे यांनी विविध प्रलंबित प्रश्न उपस्थित केले. अधिकाऱ्यांनी यात प्रामुख्याने लक्ष घालून सोडवावेत याबाबत आपण वेळोवेळी आढावा घेणार असल्याचे श्रीमती खडसे यांनी सांगितले.  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व 27 विभागाच्या कामाचे सादरीकरण केले. त्यात पूर्ण झालेले, प्रलंबित कामे याची सविस्तर माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here