सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने स्पर्धा

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन 

मुंबई, दि. 6 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन 2024 च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुररस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. राज्यातील अधिकाधिक मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

राज्यात गणेशोत्सवास दिनांक 7 सप्टेंबर रोजी सुरुवात होत आहे. राज्य समितीकडे जिल्हास्तरीय निवड समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 आणि अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 44 प्राप्त शिफारशींमधून गुणांकन आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड केली जाणार आहे. वरीलप्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल आयडीवर 31 ऑगस्टपूर्वी परिपूर्ण अर्ज सादर करावेत.

या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. त्यांना गुण दिले जातील. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

या स्पर्धेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन संवर्धन, राज्यातील गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय/राज्य स्मारके, धार्मिक स्थळांविषयी जनजागृती, जतन व संवर्धन, सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहीत), ध्वनिप्रदूषणरहित वातावरण, पारंपरिक/ देशी खेळांच्या स्पर्धा आणि गणेश भक्तांसाठी देत असलेल्या  प्राथमिक सुविधा आदी बाबींवर गणेशोत्सव मंडळांना गुणांकन दिले जाणार आहेत.

विजेत्यांच्या निवडीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या समितीचा अध्यक्ष असेल. याशिवाय या समितीत शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी सदस्य असतील, तर जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव असतील. निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हिडिओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. ही समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी 1 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हिडीओसह राज्य समितीकडे सादर करेल.

जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस केलेल्या याद्यांमधून तीन विजेते क्रमांक निवडीसाठी राज्यस्तरावर समिती असेल. या समितीत सर जे. जे. कला विद्यालयाचे अधिष्ठाता, वरिष्ठ प्राध्यापक अध्यक्ष असतील, तर पर्यावरण विभागातील वरिष्ठ गट ‘अ’ मधील अधिकारी सदस्य, तर राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य जनसंपर्क अधिकारी सदस्य सचिव असतील.

गणेशोत्सव स्पर्धेअंतर्गत भाग घेणाऱ्या मंडळांपैकी मागील सलग 2 वर्षे राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत.

000

दीपक चव्हाण/विसंअ