ऑनलाईन माध्यमातून होणारे बालकांचे लैंगिक शोषण रोखणे सर्वांची जबाबदारी –  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

0
36

‘सेफ वेब फॉर चिल्ड्रन’ कार्यक्रमाचे उद्घाटन

मुंबई, दि.६ : लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांना इंटरनेटमुळे जगभरातल्या ज्ञानाची कवाडे खुली झाली आहेत. परंतु लहान मुलांविरोधातील गुन्हेगारीही वाढली आहे. त्यातूनच ऑनलाईन माध्यमातून होणारे  मुलांचे लैंगिक शोषण रोखणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी  केले.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेफ वेब फॉर चिल्ड्रन’ (SAFE WEB FOR CHILDREN) या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, एकात्मिक बाल विकास योजना आयुक्त कैलास पगारे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके,पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, चाइल्ड फंड इंडियाचे राजेश रंजन सिंग आदी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, सोशल मीडिया, इंटरनेटच्या वापरामुळे आपले आयुष्य जसजसं सोप होत आहे, तशीच आपली प्रायव्हसी त्यामुळे कमी होत आहे. हॅकर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन मार्गांनी फसवणूक करत आहेत. सोशल मीडिया, इंटरनेट आणि नवे तंत्रज्ञान याचा सुरक्षितरित्या वापर करणे आवश्यक आहे. लहान मुलेही इंटरनेट वापरत असल्यामुळे त्यांच्या पालकांपर्यंत पोहचून सायबर क्राईमबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.

सध्या लहान मुलांकडे स्वतःचा मोबाईल नसला, तरी मुलांना गप्प बसवण्यासाठी म्हणून पालक स्वतःचा मोबाईल मुलांना देतात. यामुळे मुलांना सोशल मीडियावर सहज प्रवेश मिळतो. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे, असे सांगून  मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की,  राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा हा कार्यक्रम खरोखरच स्तुत्य आहे. महिला व बालविकास विभागातर्फे या उपक्रमाला पाठबळ देण्यात येईल, असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.

श्रीमती शाह प्रास्ताविकात म्हणाल्या, लहान मुले, महिला आणि पालक यांच्यात वेब सुरक्षा याविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुलांनी इंटरनेट चा सुरक्षितरित्या आणि इंटरनेट चा योग्यप्रकारे वापर कसा करावा यासाठी मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे. सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि मुलांचे ऑनलाईन लैंगिक शोषण व गैरवर्तन यापासून संरक्षण करणे या उद्देशाने मुलांसाठी ऑनलाईन सुरक्षिततेचा उपक्रम राज्यात राबविण्यात येणार असल्याचे शाहा यांनी सांगितले.

या कार्यक्रमास विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here