आपत्ती व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि. 7 :-  कोणतीही आपत्ती सांगून येत नाही. आपत्तीमध्ये होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.  आपत्ती बाबतच्या पूर्वसूचना नागरिकांना जलद व वेळेत मिळाल्या पाहिजेत, यासाठी आपत्ती व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा, असे प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले.

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित ‘दक्ष’ आपत्ती व्यवस्थापन परिषद 2024 चा आरंभ आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आला. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी संजय यादव, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक लहुराज माळी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन संचालक महेश नार्वेकर आदी उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. पाटील म्हणाले, नैसर्गिक आपत्ती आपण टाळू शकत नाही.  मात्र आपत्तीमध्ये होणारे नुकसान कमीत कमी होईल याची दक्षता घेऊ शकतो. भूस्खलन, पूर, वीज पडणे, चक्रीवादळ, गारपीट, उष्णतेच्या लाटा यासारख्या आपत्तीच्या सूचना नागरिकांना आपत्तीपूर्वी मिळणे महत्त्वाचे असून यासाठी सॅटेलाइटचा वापर होणे गरजेचे आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे ज्ञान, सुरक्षित जीवनाचे वरदान असल्याचे सांगून आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. पाटील म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनाचे हे ज्ञान  सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे.

आपत्तीमध्ये मदत व बचाव कार्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कार्यात एनडीआरएफ, आपदा मित्र, पोलीस, याबरोबरच  सर्व  विभागांचे मोठे योगदान असते. आपत्ती व्यवस्थापन विभागाने आयोजित केलेल्या या परिषदेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन बाबत करावयाच्या उपाययोजनावर चर्चा होऊन पुढील रणनीती ठरविण्यास ही परिषद उपयुक्त ठरेल, असा विश्वास श्री.पाटील यांनी व्यक्त केला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन संचालक महेश नार्वेकर म्हणाले, वातावरणीय बदल झपाट्याने होत आहेत. नैसर्गिक आपत्ती ही टाळता येत नसून नैसर्गिक आपत्ती नंतरची स्थिती फार भयावह असते. यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन करणे महत्त्वाचे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनामध्ये  उल्लेखनीय काम केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे निवृत्त उपायुक्त अनिल लाड यांनी आपत्ती प्रतिसादाकरिता आवश्यक सज्जता, आपत्ती परिस्थितीत नागरिकांची जबाबदारी आणि प्रसिद्धी माध्यमांची आवश्यक भूमिका याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

चर्चासत्रात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन संचालक महेश नार्वेकर, भारतीय हवामान विभागाचे सुनील कांबळे एनडीआरएफ चे सारंग कुर्वे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे राज्य प्रकल्प अधिकारी श्रीदत्त कामत, कल्याण डोंबिवली महापालिकेचे निवृत्त उपायुक्त अनिल लाड आणि रोटरी इंटरनॅशनल चे दिनेश मेहता यांनी सहभाग घेतला.

कार्यशाळेस आपदा मित्र,आपदा सखी व एनएसएसचे विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००

एकनाथ पोवार/विसंअ