सर्वांच्या सहभागातून ‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करावे – अपर मुख्य सचिव विकास खारगे

0
25

मुंबई, दि. ७:  महाराष्ट्रात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान दि. ९ ते १५  ऑगस्ट या दरम्यान राबविण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिन आपला राष्ट्रीय सण असून त्याच उत्साहवर्धकतेने हे अभियान सर्वांच्या उत्स्फूर्त  सहभागातून यशस्वीरीत्या राबवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले.

राज्यात घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यासंदर्भात सर्व  विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणा प्रमुखांसोबत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे  मंत्रालयात श्री.खारगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक  झाली.  यावेळी त्यांनी संबंधितांना सूचित केले.  यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सांस्कृतिक विभागाचे अधिकारी तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. गोविंदराज यांच्यासह सर्व  विभागीय आयुक्त, तसेच संबंधित सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

श्री.खारगे यांनी सांगितले की, महाराष्ट्राने स्वातंत्र्यलढ्यात भरीव योगदान दिलेले असून देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत महाराष्ट्राचे अनन्यसाधारण स्थान आहे. या पार्श्वभूमीवर घरोघरी तिरंगा अभियानही संपूर्ण उत्साहात व्यापक प्रमाणात आपणा सर्वांना साजरे करायचे आहे. सर्व जिल्हा, तालुका आणि गावांमध्ये हे अभियान विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण संकल्पनासह राबवायचे आहे. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आपल्या विभागातील, जिल्ह्यातील ध्वजाची मागणी आणि त्याप्रमाणे मुबलक प्रमाणात ध्वजाची उपलब्धता ठेवावी. त्याचसोबत सर्व ध्वजाचा सन्मान ठेवला जाईल, याची खबरदारी सर्वांनी घ्यायची आहे. सर्व नागरिकांना आपल्या घरांवर त्यासोबतच, शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, संस्था, संघटना कार्यालय या सर्वांना या अभियानात सक्रिय सहभागी होत दि.१३ ते १५ या कालावधीत तिरंगा लावण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.

विविध शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान लोकाभिमुख करण्यासाठी यंत्रणांनी विशेष प्रयत्न करावे. या अभियानानिमित्त रॅली, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, राष्ट्रध्वजासोबत सेल्फी, प्रतिज्ञावाचन असे विविध उपक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत करावे, जेणेकरून या अभियानात सक्रिय सहभागी होण्याची प्रेरणा नागरिकांना मिळेल.

केंद्र शासनाने सन 2022 पासून हर घर तिरंगा (घरोघऱी तिरंगा) अभियान सुरु केले. यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष असून  या वर्षी देशभरात  13 ते 15 ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’  अभियान राबविले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर घरोघरी तिरंगा अभियान राज्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत साजरे केले जाणार आहे. मागील दोन्ही वर्षी या अभियानात महाराष्ट्र राज्याने विविध उपक्रम राबवून आघाडी घेतली. यावर्षीही तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्यात यावे, असे अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी यावेळी सांगितले.

००००

वंदना थोरात/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here