गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अपघातग्रस्त शेतकरी किंवा वारसदारास रु. ७७.५४ कोटी निधी वाटप

0
15

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये रु.78.54 कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यामध्ये  एकूण पात्र 3998 विमा दाव्यांपैकी 3954 अपघातग्रस्त शेतकरी/ वारसदारास रु.77.54 कोटी निधी वाटप करण्यात आला आहे.तर राज्यात 2024-25 या  आर्थिक वर्षासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना राबविण्यात येत असून या योजना व खंडित कालावधीतील विमा दावे निकाली काढण्यासाठी 120 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे.

योजनेची संक्षिप्त माहिती :-

राज्यात शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस / त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता 19 एप्रिल,2023 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेऐवजी संपूर्णत: प्रशासकीय यंत्रणेमार्फत  “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” नव्या स्वरुपात राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेमध्ये राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतक-यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही 1 सदस्य (आई-वडील, शेतक-याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती ) असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 जणांचा समावेश करण्यात आलेला आहे. राज्यातील सुमारे 1.52 कोटी वहिती खातेदार शेतकरी व वहिती खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियातील एका सदस्याचा देखील सदर विमा योजनेअंतर्गत समावेश करुन एकूण 3.04 कोटी जणांना या योजनेमध्ये समावेश करुन  ही योजना अधिक व्यापक व सर्वसमावेशक करण्यात आलेली आहे.

योजनेअंतर्गत मिळणारे लाभ :-

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येते. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येते.अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येते.अपघातामुळे एक डोळा  अथवा एक अवयव निकामी  झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येते.

पात्रतेच्या अटी व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदीनुसार राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी, राज्यातील 10 ते 75 वयोगटातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकरी कुटुंबातील कोणताही एक सदस्य (आई-वडील,शेतक-याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती).ज्या नोंदीवरुन अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव 7/12 वर आले असेल अशी सबंधित फेरफार नोंद (गाव नमुना नंबर 6-ड). शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. 6- क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, अपघाताचे स्वरुपानुसार विहित केलेली इतर कागदपत्रे.

विमा संरक्षणामध्ये समाविष्ट बाबी : रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा.  विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात.  वीज पडून मृत्यू, खून, उंचावरुन पडून झालेला अपघात. सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्यांडून झालेल्या हत्या,जनावरांच्या खाल्ल्यामुळे / चावण्यामुळे जखमी/ मृत्यू , दंगल ,अन्य कोणतेही अपघात.

विमा संरक्षणामध्ये समाविष्ट नसणाऱ्या बाबी : नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपुर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करुन घेणे. गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात. अंमली पदार्थाच्या अमलाखाली असतांना झालेला अपघात. भ्रमिष्टपणा, बाळंतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्त्राव. मोटार शर्यतीतील अपघात. युद्ध, सैन्यातील, जवळच्या लाभधारकाकडून खून.

वारसदार : अपघातग्रस्ताची पत्नी/अपघातग्रस्त स्त्रीचा पती, अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी. अपघातग्रस्ताची आई , अपघातग्रस्ताचा मुलगा , अपघातग्रस्ताचे वडील , अन्य कायदेशीर वारसदार.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here