शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून भिल्ल समाजासाठी स्वतंत्र योजना सुरू करण्याचा विचार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
9

मुंबई, दि. ८ :-  भिल्ल समाजाची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या  माध्यमातून भिल्ल समाजासाठी स्वतंत्र योजना सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने बैठक झाली.  बैठकीस आमदार मंगेश चव्हाण, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, अपर आयुक्त सुदर्शन नगरे, निलेश अहिरे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, भिल्ल समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी पुरेशी आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली जाईल. या समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी  निधी कमी पडू दिला जाणार नाही.  भिल्ल समाजासाठी घरकुल योजनेचा लक्षांक वाढवून अनुदानामध्ये वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे.

भडगाव (जि.जळगाव) येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प  कार्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असून या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बैठकीत दिल्या. तसेच भगवान वीर एकलव्य यांचे मंदिर तसेच पुतळा उभारण्यासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ केली जाईल,असे ते म्हणाले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here