संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नव्याने उभे करु – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही  

* पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली नाट्यगृहाची पाहणी

* उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन नाट्यगृहासाठी अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार

* नाट्यगृह आगीत जळून भस्मसात होणे हे हृदयाला चटका लावणारे..

* राजर्षी शाहू महाराजांनी उभं केलेलं हे वैभव पुन्हा दिमाखात उभारणं ही आम्हा सर्वांची जबाबदारी ; यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार..

* आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येणार

 

कोल्हापूर, दि.9 (जिमाका) : नाट्य कलाकारांच्या कलेला चालना देण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नव्याने उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करु, अशी ग्वाही देत दोन दिवसातच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. हे वैभव पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने आणि दिमाखात उभारण्यासाठी जास्तीत- जास्त निधी मिळवण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करु, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरात बांधलेले केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजे सांस्कृतिक वैभवच. सन १९१२ मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी हे पॅलेस थिएटर उभारले होते. गुरुवारी दि. ८ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा या नाट्यगृहाला भीषण आग लागली. या आगीत बहुतांशी नाट्यगृह जळून बेचिराख झाले. आज शुक्रवार दि. ९ रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईहून महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कोल्हापुरला आल्यावर रेल्वे स्टेशनवरुन थेट नाट्यगृह गाठले. जळून भस्मसात झालेल्या नाट्यगृहाची व खासबाग मैदान परिसराची त्यांनी पाहणी केली. भीषण आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या बेचिराराख नाट्यगृहाची भग्न परिस्थिती पाहून पालकमंत्री हसन मुश्रीफ भावुक झाले.

या नाट्यगृहाची पाहणी करताना पालकमंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, आगीच्या भक्षस्थानी सापडलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा फार मोठा ठेवा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी रोम देशात गेल्यानंतर तिथले नाट्यगृह पाहून इथल्या स्थानिक नाट्य कलाकारांच्या कलेला चालना देण्यासाठी हे नाट्यगृह बांधले होते. ते आगीत जळून भस्मसात होणे ही हृदयाला चटका लावणारी, मन सुन्न करणारी बाब आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कोल्हापूरला येताना रेल्वे प्रवासात रात्री उशिरा ही घटना मला सोशल मीडियावर समजली. आगीची ती दृश्ये मनाला अत्यंत अस्वस्थ करणारी आणि वेदना देणारी होती. नाट्य कलाकारांना प्रोत्साहन, चालना देण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी उभारलेले हे सांस्कृतिक वैभव पुन्हा उभे करणे किंबहुना याच्यापेक्षा अधिक चांगले, अद्ययावत पद्धतीने निर्माण करणे ही आम्हा सर्व लोकप्रतिनिधी आणि शासनाची जबाबदारी आहे, यासाठी नक्कीच प्रयत्न करण्यात येतील, तसेच या ऐतिहासिक वास्तूला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिकेच्या आयुक्त डॉ .के. मंजूलक्ष्मी, माजी नगरसेवक आदिल फरास यांसह अधिकारी उपस्थित होते.