सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार संकुलाचे भूमिपूजन
सातारा दि. 9 (जि.मा.का.) :- सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कै. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या नावाने भव्य उपबाजार व्यापारी संकुल 15 एकर जागेवर 130 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत आहे. या संकुलात शेतकरी, व्यापारी, हमाल व ग्राहक यांच्यासाठी सर्व सोयी -सुविधा देण्यात येणार आहेत. या संकुलाच्या उभारणीसाठी शासनाकडूनही मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
खिंडवाडी, सातारा येथे सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कै. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले उपबाजार व्यापारी संकुलाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समिर शेख, जिल्हा निबंधक मनोहर माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, धैर्यशील कदम आदी उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले, शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी उपबाजार समितीच्या संकुलाची उभारणी होत आहे याचा आनंद होत आहे. संकुल उभारणीच्या माध्यमातून कै. श्रीमंत छत्रपती अभसिंहराजे भोसले यांचीही स्वप्नपुर्ती होणार आहे. शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना चांगला बाजार, सोयी सुविधा मिळाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनालाही चांगला दर मिळतो. सातारा जिल्हा शुरविरांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. हा जिल्हा फळ पिकांबरोबर अनेक पिके घेत आहे. येथील उत्पादन महाराष्ट्राबरोबर देशातही जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उभारण्यात येणाऱ्या भव्य बाजार संकुलात शेतकरी, व्यापारी व हमालांसाठी स्वतंत्र इमारती असून शेतकऱ्यांचा माल साठवणुकीच्या सर्व सुविधा आहेत. हे संकुल आधुनिक उपबाजार समिती असणार आहे. संकुलाच्या उभारणीसाठी शासन मदत करेल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शेवटी सांगितले.
प्रास्ताविकात आमदार श्री. भोसले म्हणाले, उपबाजार समितीचे व्यापारी संकुल फाइवस्टार पद्धतीचे उभारण्यात येणार आहे. हे संकुल 15 एकर जागेत उभारले जाणार आहे. शेतकरी, व्यापरी व ग्राहकांसाठी सोयी सुविधा असणार आहेत. सातारा शहरात बाजार समिती असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. लवकरच भाजीपाला व फळ मार्केट येथे सुरु करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील वाहतुककोंडी होणार नाही. उपबाजार समिती महामार्गालगत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची वाहतुक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर या संकुलाच्या उभारणीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाबरोबर शहराचाही विकास होईल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000