पशुधन विकासाची पंचसूत्री मांडणारा ‘पशुसंवर्धन पंधरवडा’

राज्यातील  नागरी व ग्रामीण लोकसंख्येस प्राथमिक गरजांच्या पूर्ततेसाठी पशुसंवर्धनाचे मोठे महत्त्व आहे. अगदी पुरातन काळापासून मानवाने पशुपालन आणि शेतीस आपला मुख्य व्यवसाय मानले आहे. यात आता कालसुसंगत बदल झाले आहेत.  पशुपालनाने  चामड्याच्या वस्तू, साहित्य निर्मिती, औषध निर्मिती यासह विविध उद्योगासाठी कच्चा माल, दूध, दुग्धजन्य पदार्थ यासह मानवी आहारातील स्थान मजबूत केले आहे. या उत्पादने, निर्मितीसाठी प्राणी उपलब्धता वाढवणे, पशुवैद्यकीय सेवा आणि पशु आरोग्य सेवा प्रदान करणे, प्राणी कल्याण आणि संवर्धनासाठी योजना राबविणे ह्या काही प्रमुख बाबी आहेत.

या पशुधनाच्या विकास आणि कल्याणासाठी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाकडून  राज्यभरात 1 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ‘पशुसंवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याचे नियोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्याचा शुभारंभ मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पशुसंवर्धन क्षेत्रात आर्थिक विकासाची मोठी संधी आहे असे त्यांनी प्राधान्याने नमूद केले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पशुधन मोठ्या संख्येत आहे, परंतु त्यापासून उत्पन्न वाढण्याची गरज  व्यक्त केली आहे.

राज्य शासनाने राज्यातील पशुधनाच्या उत्पादक क्षमतेचा पुरेपूर वापर करुन पशुपालनापासून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे राष्ट्रीय सकल उत्पादनात भर टाकण्यासाठी  पावलं टाकली आहेत. या दृष्टीने ‘पशुसंवर्धन पंधरवडा’ मध्ये विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. या दृष्टीकोनातून पशुधनाचे ‘उच्च उत्पादन ते व्यवस्थापन’ या पंचसूत्रीचे महत्व सांगणे,  केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देऊन योजनांमध्ये सहभागी होण्यास पशुपालकांना प्रवृत्त करणे, यासाठी ‘पशुसंवर्धन पंधरवडा’ मध्ये  जनजागृती केली जाते आहे.

पशुपालक व शेतकऱ्यांसाठी व्यावसायिक दृष्टीकोन फायद्याचा आर्थिक स्त्रोत

पशुपालन हा व्यवसाय केवळ शेतीपूरक अथवा जोडधंदा न राहता तो पशुपालकाचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत होईल या दृष्टीकोनातून पशुपालन उद्योजकता निर्माण करण्यासाठी विभागाकडून पंचसूत्रीच्या अंमलबजावणीसाठी  प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यातील पशुधनाची पूर्ण उत्पादनक्षमता वापरात आणणे तसेच उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी प्रोत्साहन देताना शेतीचा जोडधंदा म्हणून पाहिले गेलेल्या या व्यवसायातील आर्थिक स्त्रोत शेतकऱ्यांसाठी फायदाचा ठरेल.

पशुपालन व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनजागृती

यासाठी पशुपालकांना व शेतकऱ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टीकोनातून फायदेशीर ठरण्यासाठी पशुजन्य पदार्थ (उदा. मांस, लोकर, अंडी इ.) तसेच दुध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन, खरेदी, विक्री याची माहिती  करुन देणे आवश्यक आहे. शासनाकडून या दृष्टीने असलेल्या संधी बाबत जागरुकता निर्माण करण्याचा यातून  मोठा प्रयत्न होतो आहे. या कालावधीत या पंधरवड्याची माहिती सर्व पशुपालकांना  व्यापक स्वरुपात  देण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाने, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायत, कृषि उत्पन्न बाजार समिती, आठवडी बाजार  इत्यादी ठिकाणी पशुपालकांसाठी कार्यक्रमांच्या माहितीसंबंधी प्रसिध्दी करून पशुसंवर्धन पंधरवड्यादरम्यान दैनंदिन कार्यक्रमांचे संयोजन व संनियंत्रण आयुक्त पशुसंवर्धन यांच्या मार्फत केले जाते आहे. पंधरवड्याच्या यशस्वीतेसाठी विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार व पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर हे विविध उपक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहेत.

‘पंचसूत्री’ व ‘चारा स्वयंपूर्ण गाव’

राज्यात  पशुउद्योजकता निर्माण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून

(अ)’उच्च उत्पादन व प्रजनन क्षमता असलेल्या वंशावळीची पैदास,

(आ )पशुस्वास्थ्य,

(इ)पशुखाद्य,

(उ)पशुचारा व

(ए)व्यवस्थापन’

या पंचसूत्रीचे महत्त्व पंधरवड्यामध्ये पशुपालकांपर्यत पोहचवण्यात येत आहे. पशुपालन व्यवसायात सकस चारा, पशुखाद्याचे महत्त्व पशुपालकांना पटवून देतना पशुचारा, पशुखाद्य, चारा उत्पादन तसेच पशुखाद्य निर्मिती योजनांच्या संदर्भात मार्गदर्शन करून ‘चारा स्वयंपूर्ण गाव’ संकल्पना राबविण्यास प्रोत्साहन देण्यात येते आहे.

याचबरोबर पशुपालकांना पशुचे लसीकरण व जंत निर्मूलन करणे पशुधनास लाळखुरकुत, सांसर्गिक गर्भपात, लम्पी चर्मरोग, घटसर्प, फऱ्या, पीपीआर, आंत्रविषार इत्यादी रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करणे, जंत निर्मूलन करणे, बाह्य परोपजीवी निमूर्लनासाठी औषध फवारणी, कृत्रिम रेतन करणे, यासह वंध्यत्व निवारण व पशु आरोग्य शिबिरे, वंध्यत्व निवारण व गोवंशीय पशुधनातील भाकड काळ कमी करण्यासाठी तपासणीसाठी पशुआरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत आहेत. पशुगणनेचे महत्त्व विषद करत राज्यभरात होणाऱ्या २१ व्या पशुगणनेत सहभागी होण्याचे आवाहन पंधरवड्यादरम्यान केले जात आहे. पंधरवड्यादरम्यान पंचसूत्रीची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाची अंमलबजावणी  गावपातळीवर शिबीरे, कार्यशाळा,व्याख्याने,  तज्ञांचे मार्गदर्शन, यशस्वी पशुपालकांचे अनुभव कथन यासांरख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते आहे.

खरंतर पशुसंवर्धन विभागाचे महत्त्व एवढ्यापुरतेच मर्यादित राहत नाही. महाराष्ट्र गोसेवा आयोगासाठी येणाऱ्या १ कोटी २७ लाख ५८ हजार इतक्या खर्चास तसेच एकूण १६ पदांच्या निर्मितीस देखील मान्यता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात ९९ कोटी ९९ लाख रुपयांची भरीव वाढ, सहकारी दूध संघ तसेच दूध प्रक्रिया उद्योगांनी दूध उत्पादक व शेतकरी कडून प्रति लिटर ३० रुपये दराने दूध खरेदीसाठी शासनाने दिलेले निर्देश, राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या सहकार्याने महानंद या राज्याच्या दूध संस्थेस नवसंजीवनी देणाऱ्या उपाययोजना,  प्रती लिटर ५ रुपये  दूध अनुदान योजना ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यास मान्यता अशा उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय पशुधन अभियान, महाराष्ट्र राज्य पशुधन विकास संस्था, पशु आरोग्य सेवा,  दुग्धविकास योजना, कुक्कुटपालन विकास योजना, मेंढी व शेळी विकास अशा अनेक उपाययोजना आणि उपक्रम नियमित राबविण्यात येतात. पशुधनाच्या विकासासाठी शासन पावलं टाकीत आहे. दूध उत्पादक शेतकरी व पशुपालकांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती पोहोचविणे, त्याचा लाभ प्रत्यक्ष पोहोचविणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून काम करण्यासाठी पंधरवड्याचा मोठा उपयोग होणार आहे.  राज्याच्या पशुसंवर्धन व विकासासाठी हे निश्चितच आशादायी आहे!!

श्री किरण वाघ,

विभागीय संपर्क अधिकारी

००००