मराठा समाजाचे विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
11

उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

सातारा येथे मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार

सातारा दि. 9 (जि.मा.का.) :-   मराठा समाज शतकानुशकतके समाजातील अठरा पगड जाती जमातींना सोबत घेऊन चाललेला आहे. या समाजाचे आर्थिक, सामाजिक उन्नतीचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिले ही शासनाची भूमिका आहे. विकासाच्या सर्व प्रश्नांबाबत चर्चेतून मार्ग काढण्यात येत आहे. कायद्याच्या चौकटीत टिकणारे कल्याणकारी निर्णय घेण्यात येत आहेत. मराठा समाजातील तरुणांनी नोकरी देणारे व्हावे यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची पुनर्रचना करण्यात येऊन या महामंडळाला बळकटी देण्यात आली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी त्यांनी मराठा उद्योजक निर्मितीचा 1 लाखाचा यशस्वी टप्पा पूर्ण केल्याबद्दल महामंडळाचे विशेष अभिनंदनही केले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने 1 लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती मेळावा येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक –निंबाळकर, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र सरकाळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्ष समीर शेख, धैर्यशील कदम आदी उपस्थित होते.

एक लाख मराठा उद्योजक निर्माण करण्याचे काम महामंडळाने केले आहे. ही निश्चतच अभिनंदनीय बाब आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मराठा समाजाच्या विकासासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. नोकऱ्यांची निर्मिती पुरेशा प्रमाणात नसल्याने मराठा समाजात नोकरी देणारे उद्योजक निर्माण करण्यासाठी महामंडळाची पुनर्रचना केली आहे. बँकांच्या माध्यमातून साडेआठ हजार कोटींचा कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. जवळपास 825 कोटी व्याज परतावा महामंडळाने दिला आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे योगदान अतिशय चांगले राहिले आहे. महामंडळाने बँकांच्या सहकार्याने आणखीन 5 लाख उद्योजक बनवाने व या उद्योजकांनी 25 लाख नोकऱ्या द्याव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सारथी सारख्या संस्थांच्या निर्मितीने गरीब शेतकऱ्यांच्या, मराठा समाजातील सर्वसामान्यांच्या तरुणांना स्पर्धा परीक्षांचे दालन उपलब्ध करुन दिले आहे. समाज, समाजातील तरुण यांच्या विकासासाठी कार्ययोजना करणे आवश्यक असते ते सारथीने करुन दाखविले आहे. आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मागणी केल्याप्रमाणे सातारा येथे मराठा समाजातील तरुणांसाठी वसतिगृह उभे करुन दिले जाईल. प्रशासनाने त्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, असे सांगून शासनाने 1 हजार 600 कोटी रुपये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला आहे. 507 विविध अभ्यासक्रम मुलींसाठी विनामुल्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचेही सांगितले.

महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी महामंडळाने एक लाखचा उद्योजक निर्मितीचा संकल्प टप्पा पूर्ण केल्याने आपण भावूक झाल्याचे सांगून महामंडळाच्या पुनर्रचनेमुळे मराठा नवद्योजकांना न्याय देण्याचे काम होत असल्याचे सांगितले. महामंडळाचे कार्य सर्वदूर पोहचविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात फिरुन आपण संवाद साधला आहे. मराठा समाजात व्यावसायीक निर्माण करण्यात महामंडळाचा वाटा मोलाचा आहे, असे सांगून यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शासकीय, सहकारी, एनबीएफसी बँकांनी मिळून साडे आठ हजार कोटींचे कर्ज वितरण मराठा समाजातील उद्योजकांना केले असून महामंडळाने सुमारे  850 कोटींचा व्याजपरतावा दिल्याचे नमूद केले.

यावेळी आमदार श्री. भोसले म्हणाले, महामंडळाने केलेल्या कर्ज वितरणात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा वाटा महत्त्वपूर्ण असून बँकेच्या माध्यमातून मराठा समाजातील गरजू उद्योग व्यवसायीकांकडे पोहचू शकलो याचे समाधान आहे.  प्रांत व तहसील कार्यालयाच्या इमारतीसाठी मंजुरी व निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच मराठा समाजाच्या मुलांसाठी वसतिगृह उभे करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

सातारा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय व तसहील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे केले. यावेळी लाभार्थ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, तरुण उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here