मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ तारखेला जमा होणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

0
30

१ कोटी पेक्षा जास्त महिलांना मिळणार लाभ

ठाणे दि.12 (जिमाका) : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना कायमस्वरूपी राबविली जाणार असून या योजनेचा पहिला हप्ता दि.17 ऑगस्ट रोजी जमा होणार असून राज्यातील १ कोटीपेक्षा जास्त महिलांना यांचा लाभ मिळणार आहे, असे विधान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी आमदार दौलत दरोडा, माजी खासदार आनंद परांजपे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) संजय बागूलमहिला आर्थिक व विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी अस्मिता मोहिते, कायापालट लोकसंचलित केंद्राच्या पदाधिकारी, महिला बचतगट व अंगणवाडीच्या महिला  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे दि. १७ ऑगस्ट रोजी संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत. “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना तयार करताना डोळ्यासमोर एकच हेतू होता, गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत. कुटुंबाच्या गरजा भागवताना महिलांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. त्या इच्छा “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेतून पूर्ण होणार आहेत. या पैशावर फक्त महिलांचाच अधिकार असावा म्हणून महिलांचे स्वतंत्र बॅक खाते ही अट ठेवली आहे. ज्या महिलांनी बॅक खाते काढले नसेल त्यांनी तात्काळ बॅक खाते काढून ३१ ऑगस्टपूर्वी “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेचा अर्ज भरावा.

कोविड काळात अंगणवाडी सेविकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपण ग्रॅज्युएटी देणार आहोत. तसेच केंद्र शासनाकडे मानधन वाढीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. १ लाख १४ हजार महिला स्मार्टफोन देण्यात आले आहे. ४ लाखापेक्षा जास्त शालेय गणवेश शिवण्याचे काम महिला बचतगटांना देण्यात आले आहे. त्यातून प्रत्येक गणवेश शिवण्यामागे प्रत्येक महिलेला ११० रुपये मिळत आहे. यातून महिलांना रोजगार मिळत आहे. अंगणवाडी सेवकांना “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेचे प्राप्त अर्ज भरल्यास प्रत्येक अर्जासाठी ५० रुपये देण्यात येत आहेत, असेही यावेळी मंत्री तटकरे यांनी सांगितले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार दौलत दरोडा यांनी कायापालट लोकसंचलित केंद्र चांगले काम करीत असून यातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. हे केंद्र करीत असलेल्या कामकाजासाठी शासनाकडून प्रशासकीय खर्चाची तरतूद करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी मंत्री महोदयांकडे केली.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी खासदार आनंद परांजपे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ३१ ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांनी अर्ज भरून घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. ही योजना कायमस्वरूपी सुरु राहणार आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजया गवारी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here