जळगाव दि. 12 ( जिमाका ) – प्रत्येक शिक्षकाने नव्या तंत्रज्ञानासह अद्ययावत राहून स्वत:मध्ये तसे बदल करून घेणे गरजेचे आहे.मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेची गुणवत्ता वाढवून सुंदर शाळा निर्माण करून शाळेचा नावलौकिक वाढवावा. यशस्वी शाळांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा ’ स्पर्धेमुळे समाजाचा शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते सेंट टेरेसा इंग्लिश मिडियम स्कूल येथे पंचायत समिती, जळगाव आयोजित “मुख्यमंत्री, माझी शाळ – सुंदर शाळा” पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते.
‘डायट’चे प्राचार्य अनिल झोपे यांनी सांगितले की, कुठल्याही व्यवस्थेच्या कामगिरीसाठी क्षमता आणि बांधिलकी या दोन गोष्टी शिक्षकांमध्ये असणे महत्त्वाचे आहे तर ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान टप्पा क्रमांक दोन मध्ये जास्तीत जास्त गुण कसे मिळवावे तसेच शाळांनी कशा पद्धतीने तयारी करावी या विषयाचे मार्गदर्शन केंद्रप्रमुख सुशील पवार यांनी केले.
सुरुवातीला “मुख्यमंत्री, माझी शाळा – सुंदर शाळा” या उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण विभाग तर्फे सेंट टेरेसा हायर सेकंडरी स्कूल जळगाव येथे आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान टप्पा क्रमांक एकचे तालुकास्तरीय पारितोषिक वितरण तसेच समग्र शिक्षा अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डायट प्राचार्य अनिल झोपे, गटशिक्षणाधिकारी सरला विजय पाटील, शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख, जितेंद्र चिंचोले, मनोज पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, नरेंद्र सपकाळे, सचिन पवार, मिलिंद बागुल, कादर कच्ची, सिस्टर जुलीएट, जितेंद्र पाटील यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी सौ. सरला पाटील यांनी केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन खलील शेख यांनी केले. सूत्रसंचालन अनिता चौधरी आणि नाझिया काझी यांनी केले.
…यांना मिळाले बक्षिस
सदर कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत तालुकास्तरीय पारितोषिक वितरण सोहळा साजरा करण्यात आला. त्यात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्य शाळा या श्रेणीतून प्रथम क्र. – ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन जळगाव शह,र मनपा उर्दू शाळा क्रमांक 11 सुप्रीम कॉलनी , द्वितीय क्रमांक- जि. प. प्राथमीक शाळा सावखेडा खु।।, तृतीय क्रमांक जि. प. प्राथमीक शाळा शिरसोली प्र. बो. या शाळेला मिळाला त्याचप्रमाणे इतर व्यवस्थापनाच्या शाळा या श्रेणी अंतर्गत प्रथम क्रमांक- सेंट टेरेसा हायर सेकंडरी स्कूल जळगाव द्वितीय क्रमांक- माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुसुंबा खुर्द तर तृतीय क्रमांक- एस एस. पी. डी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद या विद्यालयाला मिळाला आहे. या कार्यक्रमांमध्ये समग्र शिक्षा अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेयर तसेच कर्णयंत्र इत्यादी साहित्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.