मुंबई शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, बालदंतरोगशास्त्र विभागात सेंसरी अँडॅप्टिव्ह डेंटल एन्व्हायर्नमेंट माध्यमातून आधुनिक उपचार

0
25

मुंबई, दि. १२ :शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई, बालदंतरोगशास्त्र विभाग या संस्थेत राबविलेल्या अभिनव व उल्लेखनीय, सेंसरी अँडॅप्टिव्ह डेंटल एन्व्हायर्नमेंट (SADE) माध्यमातून अधुनिक उपचार होत आहेत. देशात अशी संकल्पना राबविणारी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई ही एकमेव संस्था आहे.

दंतउपचारासाठी येणाऱ्या रुग्णामध्ये दंतउपचाराविषयी एक अनामिक भिती असते, लहान मुलांमध्ये तर ही भिती खूप असते, त्यामुळे मुले उपचारासाठी सहज तयार होत नाही आणि जर उपचारासाठी तयार झाले, तरीही उपचारास हवे तितके सहकार्य करत नाही. मुलांच्या अपेक्षित सहकार्याशिवाय व्रणोपचारकास प्रभावी उपचार देणे जिकिरीचे होऊन बसते. या सर्वांचा मुलांच्या मुखआरोग्यावर व पर्यायाने संपुर्ण आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

अनेक शास्त्रोक्त अभ्यासांमध्ये असे आढळुन आले आहे की, जर मुलांच्या सर्व ज्ञानेद्रियांना आल्हाददायक संवेदना दिल्या तर ते शांत होतात व त्यांच्या मनातील भीती कमी होण्यास मदत होते. त्याअनुषंगाने मुलांच्या मनातील भिती कमी करुन त्यांचे उपचाराकरिता सहाय्य मिळविण्याकरिता शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई येथील बालदंतरोगशास्त्र विभागात SADE (Sensory Adaptive Dental Environment) ही नाविन्यपुर्ण संकल्पना राबविण्यात आलेली आहे.

ह्या संकल्पनेविषयीची थोडक्यात माहिती :

SADE (Sensory Adaptive Dental Environment)

सेंसरी अॅडॅप्टिव्ह डेंटल एन्व्हायर्नमेंट (SADE) ही एक अत्याधुनिक प्रणाली आहे जी बालरुग्णांच्या दंतचिकित्सा अनुभवाला अधिक आरामदायक बनवण्यासाठी विकसित केली गेली आहे. SADE रुग्णांच्या संवेदनशीलतेचा विचार करून दंतचिकित्सकांच्या प्रॅक्टिसमध्ये सुधारणा करते.

SADE चे घटक

१. प्रकाश व्यवस्थापन:- SADE मध्ये विशेष प्रकाशयोजना वापरली जाते, जी रुग्णांना आरामदायक वाटेल. उगाच चमकणारे किंवा त्रासदायक प्रकाश टाळले जातात.

२. ध्वनी नियंत्रण:- SADE मध्ये सौम्य आणि शांत ध्वनी वातावरण तयार केले जाते. हे रुग्णांच्या मनातील भीती कमी करण्यास मदत करते.

३. स्पर्श संवेदनाः- रुग्णाच्या संवेदनशीलतेनुसार उपकरणांचे वापर नियंत्रीत केले जाते, ज्यामुळे उपचारादरम्यान कमी वेदना होतात.

४. वातावरणीय तापमान:- SADE मध्ये रुग्णांच्या आरामदायीतेनुसार तापमान ठेवले जाते, ज्यामुळे त्यांना उपचारादरम्यान अधिक सुसह्य वाटते.

५. गंध व्यवस्थापनः दंतचिकित्सालयातील रुग्णालयीन गंध कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातात, ज्यामुळे रुग्णांना आरामदायक वाटते.

  • SADEचे फायदे

१. आरामदायक वातावरणामुळे रुग्णांच्या मनातील भीती कमी होते.

२. आरामदायी वातावरणामुळे रुग्ण अधिक सहकार्य करतात, ज्यामुळे उपचार अधिक प्रभावीपणे पार पाडले जातात.

३. SADE मुळे रुग्णांचा दंतचिकित्सा अनुभव अधिक आनंददायक होतो, ज्यामुळे ते नियमित तपासणीसाठी येण्यास तयार होतात.

४. SADE मुळे दंतचिकित्सक आणि रुग्ण यांच्यातील संबंध अधिक दृढ बनतात आणि रुग्णांच्या आरोग्याची काळजी अधिक चांगल्या प्रकारे घेतली जाते.

वरील प्रणालीचा संस्थेते मागील १५ महीन्यांपासून वापर केला जात असून १५० हून अधिक मुलांवर याअंतर्गत उपचार केले गेले आहे. यासाठी बालदंतरुग्णाचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच, SADE उपचार प्रणाली बद्दल बालरुग्ण व पालकांमध्ये सर्वेक्षण केले असता, असे आढळून आले आहे की, ७१% पालक आपल्या पाल्याच्या उपचाराबद्दल अधिक समाधानी आहे. ६४% मुलांना ही उपचार पध्दती अधिक अल्हाददायक वाटली. तसेच, ९५% पालकांना व मुलांना ह्या उपचार पध्दतीचा अनुभव आवडला.

याबद्दल बालदंतरोगशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. डिंपल पाडावे यांनी या संकल्पनेवर आधारीत राष्ट्रीय परिषदेत व्याख्यान दिले व नामांकित नियतकालीकामध्ये शोधनिबंध देखील प्रकाशित केला असल्याची महिती रुग्णालयामार्फत देण्यात आली आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here