अमळनेर शहरासाठी १९५ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि. १३ :- अमळनेर शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नगरोत्थान महाभियानांतर्गत अमळनेर शहर नगरपरिषदेच्या १९५.३४ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेस राज्य शासनाने  प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांमुळे १९५.३४ कोटीची नवीन पाणी पुरवठा योजना साकारणार आहे. या योजनेमध्ये प्रकल्प किंमतीच्या ९० टक्के  रक्कम राज्य शासनामार्फत तर  १० टक्के  रक्कम संबधित स्थानिक स्वराज्य संस्थेची राहणार आहे. यानुसार योजनेसाठी राज्य शासनाकडून १७५.८१ कोटी रुपये उपलब्ध होणार असून १९.५३ कोटी रुपयाचा हिस्सा अमळनेर नगरपरिषदेचा राहणार आहे.

नगरोत्थान महाअभियानांतर्गत अमळनेर शहर पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यतेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. या पाणी पुरवठा योजनेस मंजुरी देण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे. या योजनेमुळे अमळनेर शहरातील नागरिकांना पुरेसे व मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याचेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

000

एकनाथ पोवार/विसंअ