इचलकरंजी शहरातील प्रलंबित योजनांची कामे तातडीने मार्गी लावून पाणी पुरवठा योजनेचे काम प्राधान्याने करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
12

मुंबई, दि. 14: इचलकरंजी शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. इचलकरंजीकरांना दिलासा देण्यासाठी शहराकरिता प्रस्तावित करण्यात आलेल्या योजना तातडीने मार्गी लावाव्यात. तसेच इचलकरंजीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहराची पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार आसिफ शेख रशीद शेख, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ. पी गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे,  वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंह उपस्थित होते. तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे, इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, विठ्ठलराव चोपडे, इचलकरंजी यंत्रमागधारक कृती समितीचे चंद्रकांत पाटील, प्रकाश गौडे, रफिक खानापुरे, सुभाष मालपाणी, इचलकरंजी रायझिंग को. ऑप सोसायटीचे पांडुरंग धोंडेपुडे, प्रल्हाद शिंदे, दिलीप ढोकळे, हर्षल पटनावर, तौफिक मुजावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, इचलकरंजी शहरातील मिळकत धारकांचा शास्तीकर रद्द करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. पिंपरी-चिंचवड शहराच्या धर्तीवर शास्तीकर माफीचा निर्णय घेण्यासाठी सर्व तांत्रिक बाबी तपासून घेण्यात याव्यात. त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करुन तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात यावा. इचलकरंजी शहरात असलेल्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन त्याच जागेवर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. त्यासोबतच इचलकरंजी शहरातील यंत्रमाग धारकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावेत. यंत्रमाग धारकांना कर्जावरील व्याजावर पूर्वीप्रमाणे रायझिंग (वॉर्पिंक) उद्योगांना देण्यात येणारी पाच टक्के व्याज सवलत मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

0000

निलेश तायडे/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here