स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार शिवाजी साटम यांना जाहीर

0
27

दिग्दर्शक एन. चंद्रा आणि दिग्पाल लांजेकर विशेष योगदान पुरस्काराचे मानकरी

मुंबई, दि. १४:  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सन २०२३ चा स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे. स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संकलक एन.चंद्रा आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी या पुरस्कारांची घोषणा केली असून दिनांक २१ ऑगस्ट रोजी एका विशेष समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रुपये १० लाख, मानपत्र व मानचिन्ह असे असून  स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप रुपये ६ लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे.  चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रुपये १० लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप रुपये ६ लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे.

‘राज्याचेच नव्हे तर देशाचे सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध करणाऱ्या या कलाकारांचा सर्वांना अभिमान आहे.  त्यांना पुरस्कार जाहीर करतांना मनापासून आनंद होत आहे. हे सर्वजण सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव अधिकाधिक उंचावत राहतील’, अशा शब्दात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी पुरस्कार प्राप्त कलावंतांचे अभिनंदन केले.

दरम्यान, पुरस्कार वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवार, २१ ऑगस्ट २०२४ रोजी, सायंकाळी ७ वाजता एनएससीआय (NSCI) डोम, वरळी मुंबई येथे होणार असल्याची माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी दिली आहे.

0000

दीपक चव्हाण/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here