कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात विभागाचे सूक्ष्म नियोजन; २८ जिल्ह्यात २५० मे.टन मेटाल्डिहाईडचा पुरवठा, गोगलगायीमुळे होणारे संकट टळले

मुंबई दि. 14: – 2022 व 2023 च्या खरीप हंगामामध्ये गोगलगायींनी पिकांच्या केलेल्या नुकसानाच्या अनुषंगाने यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात कृषी विभागाने केलेल्या सूक्ष्म नियोजनाचे फलित म्हणून यावर्षी गोगलगायीचे संकट पूर्णतः नियंत्रणात आले आहे.

सन 2022 आणि 2023 या वर्षात राज्यामध्ये बहुतांशी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेती पिकाचे आणि फळ पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामध्ये बीड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, यवतमाळ  आदी जिह्यांमध्ये नुकसानाचे प्रमाण अधिक होते. इतरही बऱ्याच जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले होते.

लातूर, बीड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये 33 टक्के पेक्षा जास्त शेत पिकाचे आणि फळ पिकाचे नुकसान झाले, त्यांचे क्षेत्र 72,490 हेक्टर होते तर नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांची संख्या 129,596 इतकी होती.

राज्यामध्ये गोगलगायीमुळे नुकसान होण्याची समस्या साधी होती. परंतु अलीकडील काही वर्षांमध्ये ही समस्या प्रमुख होत गेली. या बाबीची दखल घेत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत प्रभावी उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आणि कृषी विभागाने याची दखल घेत राज्य पुरस्कृत सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी प्रकल्पाअंतर्गत राज्याच्या 28 जिह्यांमध्ये 250 मे.टन मेटाल्डिहाईड या गोगलगाय नाशकाचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामामध्ये या बाबीची प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून 2024 च्या खरीप हंगामामध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव पूर्ण नियंत्रणात आणला गेला.

यावर्षीच्या खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्यामुळे पीक परिस्थिती चांगली असून गोगलगायीचा प्रादुर्भाव नगण्य असून राज्यामध्ये कृषि मालाचे उत्पादन उच्चांकी असेल अशी भावना शेतकऱ्यांमध्ये तयार झाली आहे. राज्यातील आणि विशेष करून लातूर, बीड, धाराशिव आदी जिल्ह्यातील अनेक  शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहे.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ