नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाला देणार क्रांतीवीर खाज्या नाईक यांचे नाव;
नंदुरबार, दिनांक 15 ऑगस्ट, 2024 (जिमाका वृत्त) – नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास क्रांतीवीर खाज्या नाईक यांचे नाव देण्याची शिफारस करणारा ठराव जिल्हा नियोजन समितीने केला असून शासनस्तरावर त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील एकही नागरिक, शेतकरी कुठल्याही आपत्तीच्या भरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती नियंत्रण, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.
ते आज भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात जिल्हावासीयांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, माजी आमदार चंद्रकांत ररघुवंशी, प्रा. इंद्रसिंह वसावे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित, जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, प्रांताधिकारी विनायक महामुनी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे आदिवासी विकास प्रकल्प अघयधिकारी चंद्रकांत पवार, उपवनसंरक्षक कृष्णा भंवर तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले की, आपला नंदुरबार आदिवासी बांधवांच्या जीवन, संस्कृतीची रूपेरी कडा लाभलेला, शूरवीरांचा,सुधारकांचा आणि लोकनेत्यांचा जिल्हा आहे.जिल्ह्यावासीयांच्या मनामनात राष्ट्राचा अभिमान जागृत करण्यासाठी 9 ऑगस्टपासून ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाची सुरूवात झाली आहे. स्वातंत्र्य चळवळ आणि शहिदांच्या पवित्र स्मृतींनी पावन झालेल्या आपल्या जिल्ह्यातील 73 “अमृत सरोवर” स्थळांवर वेगवेगळ्या उपक्रमांमधून जनउत्सवाचे आयोजन केले गेले आहे. 1 ऑगस्ट पासून सुरु झालेल्या ‘महसूल दिन पंधरवाडा’ मधून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. शासनामार्फत शेतकरी बांधवांना दिलासा देणारी “मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना” सुरू करण्यात आली आहे. याद्वारे जिल्ह्यातील 45 हजार 561 शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. त्यासाठी रुपये 33 कोटी 5 लाख अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 66 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 8 मध्यम व 13 लघु सिंचन प्रकल्पांमध्ये सुमारे 57 टक्के जलसंचय झाला असून त्यातील 4 मध्यम प्रकल्प हे 100 टक्के भरले आहेत. या खरीप हंगामात 2 लाख 71 हजार 414 हेक्टर क्षेत्रावर 99 टक्के पेरण्या झाल्या असून पिक परिस्थितीही समाधानकारक आहे. यंदा जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र 110 टक्क्यांनी तर सोयाबीनचे क्षेत्र 118 टक्क्यांनी वाढले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 1 लाख 13 हजार 440 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. 2023 च्या खरीप हंगामात 39 हजार 745 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात 54 कोटी 19 लाख 93 हजार 285 रूपये जमा करण्यात आले आहेत. यंदाच्या मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात नुकसान झालेल्या 296 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 27 लाख 62 हजार 630 रूपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आले आहे.
पालकमंत्री म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे झालेल्या पशुहानीसाठी रुपये 11 लाख 82 हजारांची, तसेच मनुष्यहानीसाठी 7 व्यक्तिंच्या कुटुंबियांना रूपये 28 लाख एवढ्या मदतीचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात 949 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच नवापूर तालुक्यात गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे घरात पाणी घुसून 603 घरांचे, दुकानांचे नुकसान झाले आहे. अशा अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नागरिक व दुकानदारांच्या नुकसानाकरिता जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत विशेष दराने मदत देण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. त्यासाठी प्रतिकुटुंब रुपये 5 हजार, घरगुती भांडी, वस्तु यांच्या नुकसानाकरिता रूपये 5 हजार देण्यात येणार आहेत. तसेच अशा प्रकरणात यापूर्वीची दोन दिवसापेक्षा अधिक काळ घर पाण्यात बुडले असल्याची अटही शिथिल करण्यात आली आहे. ज्या दुकानदारांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्डधारक आहेत अशा नोंदणीकृत व परवानाधारक दुकानदारांच्या पंचनामे करुन 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसेच अधिकृत टपरीधारकांनाही 10 हजार रुपयांची आर्थिक मदतही देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकही शेतकरी अथवा नागरिक नैसर्गिक आपत्तीच्या भरपाईपासून वंचित राहणार नाही याची ग्वाही, मी जिल्ह्याचा पालकमंत्री व राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून आपणांस देतो.
पालकमंत्री म्हणाले की, दाट वस्तीच्या ठिकाणी किंवा छोट्या स्वरूपातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून फायर बाईकचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला असून त्याची सुरूवात 9 फायर बाईक्सचे लोकार्पण व वितरण करून आपल्या जिल्ह्यातून करण्यात आली आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबुत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेत जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 61 हजार 997 महिला भगिनींच्या खात्यात येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधनच्या दिवशी जुलै व ऑगस्ट महिन्याची रक्कम एकाचवेळी जमा करण्यात येणार आहे. या भगिनींना “मुख्यमंत्री अन्नपूर्णा” योजनेत वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. येणाऱ्या गौरी-गणपती उत्सवानिमित्त 2 लाख 70 हजार 99 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरीत करण्यात येणार आहे.
पालकमंत्री म्हणाले की, मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरु केलेल्या लेक लाडकी योजनेत चालू वर्षात 1 हजार मुलींच्या बॅंक खात्यावर 5 हजार रूपयांच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. तरुणांना खाजगी तसेच शासकीय आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा, म्हणुन सुरु केलेल्या “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजनेत जिल्ह्यात 2 हजार उमेदवारांना प्रथम टप्प्यामध्ये लाभ मिळणार असुन सध्या 120 उमेदवार या योजनेंतर्गत कामावर रुजू झालेले आहेत. राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यात आली आहे. 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता 100 टक्के अर्थसहाय्य देणारी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ शासनाने सुरू केली आहे. दारिद्र्य रेषेखालील दिव्यांग, दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे या योजनेत खरेदी करता येणार आहेत. महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटरटॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करुन त्यासाठी शासनाने 50 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अनोखे अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत यशस्वीरित्या राबविण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात या अभियानात 2 हजार 85 शाळांनी सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी करून दाखवले, त्याबद्दल शिक्षण विभाग व सर्व शाळांचे मी अभिनंदन करतो.
पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रूग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांची यंत्रणा सदैव प्रयत्नशील आहे. “लक्ष्य 84 दिवस” या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील संस्थात्मक प्रसूतीचा दर 97 टक्क्यांपर्यंत आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश प्राप्त झाले असून शासनाने सन 2024-25 मध्ये नव्याने 3 ग्रामीण रुग्णालये, 5 प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच 50 आरोग्य उपकेंद्रांना मंजूरी दिली आहे. आरोग्य सेवेच्या महत्वपूर्ण अशा हॉस्पिटल रॅंकींगमध्ये जून महिन्यात जिल्हा सामान्य रूग्णालय 70 गुण मिळवून राज्यात अव्वल राहिले आहे, त्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक व त्यांच्या टीमचे मी या निमित्ताने अभिनंदन करतो. “मुलांमधील अंमली पदार्थ आणि मादक पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी प्रतिबंध” या संयुक्त कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी गेल्या 2 वर्षात “सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या” जिल्ह्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्याला गौरविण्यात आले आहे, त्याबद्दल जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यांचे मी अभिनंदन करतो. जिल्ह्यातील दळणवळण अधिक सुलभ व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 704 कोटी रूपए खर्चाच्या रस्ते, संरक्षक भितं व लहान पूलांच्या एकूण 902 कामांना मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 300 वाड्यावस्त्या रस्त्यांनी जोडल्या जाणार आहेत. यात 300 किलोमीटर रस्ते व 30 लहान, मोठ्या पुलांचा समावेश आहे.
पालकमंत्री म्हणाले की, सन 2024-25 साठी जिल्हा वार्षिक योजनांकरीता 595 कोटी 25 लाख इतका नियतव्यय अंतिमतः मंजूर केला आहे. त्यातील सर्वसाधारण योजनेत 192 कोटी रुपये, आदिवासी उपयोजनेत सुमारे 389 कोटी 25 लाख तसेच अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 14 कोटी रुपयांचा समावेश आहे. जिल्ह्यातील आदिवासी समुदायाचे सांस्कृतिक वेगळेपण, मानवतेबद्दल असलेली असीम श्रद्धा, निसर्गाच्या संतुलनावर असलेले प्रेम आणि उत्त्युच्च प्रामाणिक, निखळ संस्कृती, परंपरांच्या गुणगौरवासोबत शासनामार्फत आदिवासी बांधवांसाठी राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांच्या जागरासाठी जागतिक आदिवासी दिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे गेल्या आठवड्यात दिनांक 7 ते 9 ऑगस्ट या कालावधीत नंदुरबारमध्ये यशस्वी आयोजन करण्यात आले होते. वनविभागाने पर्यटन व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामातुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. यंदाच्या पावसाळ्यात 790 हेक्टर क्षेत्रावर 8 लाख 19 हजार 580 रोपांची लागवड केली आहे. केंद्र शासनाच्या “एक पेड माँ के नाम” उपक्रमातून विविध स्तरावर वृक्षारोपन कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यात तोरणमाळ, उनपदेव, मोहीदा इकोपार्क, नंदुरबार इकोपार्क, गिधकडा धबधबा, कोंडाईबारी वनपर्यटन क्षेत्र विकास आराखड्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वनपर्यटनाच्या वाढीस चालना मिळणार आहे.
शासनाने सुरु केलेल्या सर्व योजनांचा लाभ आपण घ्यावा, असे आवाहन मी या निमित्ताने करतो, तसेच कुठल्याही परिस्थितीत शासन जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी सर्व सामान्य नागरिक यांच्या पाठीशी सर्वोतोपरी उभे असल्याची ग्वाही देतो असे त्यांनी यावेळी सागितले.
यावेळी विविध विभागात उत्कृष्ट काम करणारे अधिकारी -कर्मचारी यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यांचा झाला सत्कार…
महसूल विभाग
• सराखाम शिंदे, तहसिल कार्यालय, शहादा
• श्रीमती मंगला पावरा, तहसिल कार्यालय, तळोदा
• संतोष मोरे, उपविभागागीय अधिकारी कार्यालय, शहादा.
• आनंद महाजन, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार
• संदीप रामोळे, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार
• प्राजंल पाटील, तहसिल कार्यालय, नंदुरबार
पोलीस विभाग
• विश्वास वळवी, पोलीस मुख्यालय नंदुरबार
• तानाजी बहिरम, वाहतुक शाखा, नंदुरबार
कृषि विभाग
• सुरज नामदार, अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, नंदुरबार
• सुरभी बाविस्कर, अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, नंदुरबार
• उमेश भदाणे, मंडळ कृषि अधिकारी कोरीट
• करणसिंग गिरासे, कृषि पर्यवेक्षक
• राज्यस्तरीय खरीप पिकस्पर्धा-2023 आदिवासी गटात प्रथम क्रमांक मिळविणारे शेतकरी झूजऱ्या पाडवी, कोठार ता. तळोदा यांचाही पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
• जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने आयोजित केलेल्या “एक धाव सुरक्षेसाठी” या मॅरेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवून उद्घाटन केले.
• पोलीसांसाठी घेतलेल्या नवीन दुचाकी वाहनांना हिरवी झेंडी दाखवून दुचाकी वितरीत करण्यात आल्या.