पालकमंत्र्यांच्याहस्ते रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन
महोत्सवात दुर्मिळ ३८ रानभाज्यांचा समावेश
यवतमाळ, दि.15 (जिमाका) : अलिकडे फास्टफुडचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. शरीरास घातक अशा खाद्यपदार्थांचा वापर टाळत नागरिकांनी विषमुक्त अशा रानभाज्यांचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश केला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जीवनोन्नती अभियानाच्यावतीने वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डावरे, कृषि विकास अधिकारी राजेंद्र माळोदे उपस्थित होते.
रानभाज्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. जुन्या लोकांना या भाज्यांचे महत्त्व माहित आहे. त्यामुळे घरातील जेष्ठ मंडळी आजही रानात जाऊन रानभाज्या आणून आपल्या घरातील मुलांना खावू घालतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर या भाज्या उपलब्ध होते. त्यामुळेच दरवर्षी पावसाळ्यात स्वातंत्र्यदिनी या भाज्यांचा महोत्सव आपण आयोजित करतो, असे पुढे बोलतांना पालकमंत्र्यांनी सांगितले.
महोत्सवाच्या निमित्ताने शहरी लोकांना रानभाजीचे महत्त्व समजून येईल. महोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘रानभाज्यांचे महत्त्व आणि उपयोग’ या पुस्तिकेतून प्रत्येक रानभाजीचे महत्त्व, या भाज्या कशा बनवायच्या हे समजेल. रानभाज्यांचा आहारात समावेश वाढविण्यासाठी या भाज्यांचा प्रचार, प्रसार मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक असल्याचे देखील पालकमंत्र्यांनी सांगितले. उद्घाटनानंतर पालकमंत्र्यांनी महोत्सवातील रानभाज्यांच्या स्टॅालला भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांनी केले. महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका त्यांनी विशद केली. महोत्सवात 38 पेक्षा जास्त रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. भाजी खरेदीसाठी यवतमाळकरांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे संचलन चंद्रबोधी घायवटे यांनी केले तर आभार संजय भोयर यांनी मानले.
000