मुंबई, दि. १५- देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगान आणि राज्यगीत गायले गेले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देताना मंत्री श्री.लोढा यांनी देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचे महत्वपूर्ण योगदान असून राज्य शासनामार्फत विविध लोकोपयोगी योजना सुरू असल्याचे सांगितले. राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, नागरिकांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, नागरिक, शालेय विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.लोढा यांनी स्वातंत्र्य सैनिक, उपस्थित विद्यार्थी, नागरिक, अधिकारी यांच्याशी संवाद साधून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शिष्यवृत्ती परीक्षांमधील राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रमाणपत्र योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे महसूल पंधरवड्यानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला.
00000
बी.सी. झंवर/वि.स.अ