स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ
लोककल्याणकारी योजना राबविण्यावर भर; जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू
सिंधुरत्न समृद्ध योजना जिल्ह्यासाठी वरदान
सिंधुदुर्गनगरी, दि.१५ (जि.मा.का) : सर्वसामांन्याच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविण्याच्या उद्देशाने आणि राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासनाने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असून त्यांचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवा, महिलांना होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अशा अनेक महत्वाकांक्षी योजनेचा लाभ जनतेला देण्यास प्राधान्य देणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर म्हणाले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते जिल्हा मुख्यालय, पोलिस परेड ग्राऊंड येथे पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले आदी उपस्थित होते. यावेळी अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली.
श्री. केसरकर म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य चळवळीला गौरवशाली इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले योगदान दिले. या लढ्याच्या यज्ञात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा अनेकांच्या त्यागातून, प्राणार्पणातून आपल्याला स्वराज्य मिळाले आहे असे सांगून ते म्हणाले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्याबरोबरच विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. जर्मनीमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी महाराष्ट्र आणि जर्मनीच्या बाडेन-वर्टेम्बर्ग राज्य यांच्यात फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या कराराचा पाठपुरावा करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वप्रथम मोफत वर्ग सुरू करण्यात आले आहेत आणि लवकरच ते सर्वत्र सुरू होतील. राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ केली आहे. आता प्राथमिक विद्यालयातील शिक्षण सेवकांना १६ हजार, माध्यमिकसाठी १८ हजार तर उच्च माध्यमिकसाठी २० हजार रूपये इतके करण्यात आले आहे. खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये पहिल्या तीन वर्षांसाठी ग्रंथपालांना १४ हजार रूपये, प्रयोगशाळा सहायकांना १२ हजार रूपये, कनिष्ठ लिपिकांना १० हजार रूपये तर केवळ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना आठ हजार रूपये मानधन देण्यात येत आहे. पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेश योजनेचा लाभ देण्यात येत आहे. याचबरोबर एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे देखील दिले जात आहेत. शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या मुलांच्या स्वागतासाठी ‘पहिले पाऊल’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
जिल्ह्यातील विकासाविषयी बोलताना ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पवित्र पोर्टल अंतर्गत ७५२ शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. माझी ई शाळा डिजिटल साक्षरता मिशन कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या २०२ शाळांमध्ये राबविला जात आहे. समग्र शिक्षा अंतर्गत १४ कोटी रुपये खर्चुन वर्गखोल्यांची दुरूस्ती करण्यात आलेली आहे. सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी दरवर्षी 50 कोटींचा निधी उपलब्ध होणार असून 107 कोटींच्या कामांना मंजूरी देण्यात आलेली आहे. त्यापैकी 57 कोटी इतका निधी वितरीत झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सावंतवाडी, कणकवली आणि सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करुन अनेक सुख सुविधा निर्माण केल्या आहेत. या तिन्ही स्थानकांचे लोकार्पण नुकतेच पार पडले. जिल्ह्यात तीन दिवस जनता दरबाराच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या अनेक समस्यांचे निराकरण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०२१ साली तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हेाते. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानासाठी शासन स्तरावरुन निधी कमी पडल्याने पाठपुरावा केल्यानंतर ३ कोटी ४६ लाखांचे अनुदान प्राप्त झाले असून त्यापैकी २ कोटी ५९ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे असेही ते म्हणाले.
शासन राबवित असलेल्या महत्वाकांक्षी योजनांविषयी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ५२७ पात्र लाभार्थ्यांच्या यादीस मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनअंतर्गत ३२४ उमेदवारांची शिकाऊ प्रशिक्षणाकरिता निवड करण्यात आली आहे. यापैकी ५५ उमेदवार संबंधित आस्थापनांवर रुजू झालेले आहेत. लेक लाडकी योजनेअंतर्गत ०१ एप्रिल २०२३ नंतर ज़न्मलेल्या २९२ मुलींना ५ हजार रुपये या प्रमाणे १४ लाख ६० हजार एवढी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत सन २०२३-२४ या वर्षात १३७ प्रकल्पांना ८ कोटी ९५ लाख रुपयांचे कर्ज मंजुर करण्यात आलेले असून २ कोटी ८६ लाख रुपयांचे अनुदान अर्थ साहाय्य स्वरुपात देण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत गट लाभार्थी मंजुरी मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम ठरलेला आहे
पोलिस प्रशासनाने ‘ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग जनजागृती अभियान’, ज्येष्ठ नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती अभियान, सायबर सिक्युरीटी व जनरल अवेरनेस उपक्रम राबविण्यात आला असेही ते म्हणाले.
विशेष गौरव
विशेष कामगिरी आणि उत्कृष्ट काम केल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री श्री केसरकर यांच्याकडून गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग पोलिस दलातील राखीव पोलीस निरीक्षक रामदास पालशेतकर यांना राष्ट्रपती पदक घोषित झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. विशेष कामगिरी केलेल्या तसेच पोलिस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह प्राप्त पोलिस अधिकारी आणि धाडसी कामगिरी केलेल्या मुलांचा यावेळी गौरव करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक पध्दतीने बनविली जाणारी हस्तकला ‘सावंतवाडी गंजिफा पेंटीग’ करीता भौगोलिक मानांकनाचे देशस्तरावरचे अधिकारी प्राप्त करुन दिल्याबद्दल ॲङ समीक्षा राजेंद्र दाभाडे यांना गौरविण्यात आले.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्ष इयत्ता ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी मध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये रुद्र पिकुळकर, संचिता संभाजी पाटील, वेदा प्रविण राऊळ, संस्कार चोपडे, चिन्मयी खानोलकर, ईशान नागवेकर यांचा समावेश आहे.
जिल्हास्तरीय युवा पुरस्कार-
श्रध्दा सतिश पाटकर, विवेक तिरोडकर, ऐश्वर्य मांजरेकर, निलम राणे,
संस्था- देव हेळेकर दशावतार नाट्यमंडळ, कारिवडे, प्रितगंध फाउंडेशन, मुंबई, साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल,
जिल्हा क्रीडा पुरस्कार-
पूर्वा संदिप गावडे हिला जलतरण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गुणवंत खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. भारतीय स्विमिंग असोसिएशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या 49 व्या ज्युनिअर नॅशनल ॲक्वॅटिक चॅम्पियनशीप स्पर्धेत सहभागी झालेली आहे. पूर्वा गावडे हिने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे.
आयुष पाटणकर याचा रायफल शुटींग एअर पिस्टर स्पर्धेत गुणवंत खेळाडू म्हणून सन्मान करण्यात आला.
सोमनाथ गोंधळी यांचा सॉफ्टबॉल, थ्रोबॉल आणि बेसबॉल मार्गदर्शक म्हणून सन्मान करण्यात आला.
उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार-
प्रथम पुरस्कार- हर्षवर्धन किरण बोरवडेकर
व्दितीय पुरस्कार – स्वप्नाली समीर शिरवडकर
००००००००