सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाधिक वेळ द्या – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

0
9

महसूल पंधरवड्याची सांगता; उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान

नागपूर, दि. १५ –  सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि शेतमजूर यांचा त्यांच्या दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भात महसूल कार्यालयाशी नियमित संबंध येतो. शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांसाठी ॲक्सेसिबल अर्थात अधिकाधिक उपलब्ध राहण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे केल्या.

दि. 1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या महसूल पंधरवडा सांगता समारोप कार्यक्रमाचे आयोजन नवीन नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती बिदरी बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्यासह जिल्ह्यातील महसूल यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी, महसूल संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी गेल्या वर्षभरात महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला.

समारोपप्रसंगी श्रीमती बिदरी पुढे म्हणाल्या की, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. त्यामुळे या विभागाचे प्रशासनात अनन्यसाधारण महत्व आहे. नागरिक मोठ्या अपेक्षेने आपल्या समस्या सोडविण्यासाठी या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे येतात. ही जबाबदारी ओळखून अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक कामकाज करीत सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिकाधिक उपलब्ध राहण्याची व गरजेनुसार तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. ई-पंचनामा हा प्रयोग विभाग स्तरावर यशस्वी ठरला असून राज्य स्तरावर या प्रयोगाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. परिणामकारक तंत्रज्ञानाचा वापर महसूल यंत्रणेत होण्याची गरज असल्याचे श्रीमती बिदरी म्हणाल्या.

जिल्हाधिकारी म्हणाले की, महसूल पंधरवड्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री, मुख्यमंत्री तीर्थदर्शन तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अधिकाधिक लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. येत्या काळातही नागरिकांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आणि जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्या हस्ते अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्हा खनिकर्म विभागाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण

जिल्हा नियोजन विभागाच्या आयपास तंत्रज्ञानाच्या धर्तीवर खनिकर्म विभागासाठी महाराष्ट्रात प्रथमच नागपूर जिल्ह्यात I-DMFMS  प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रणालीसोबतच जिल्हा खनिकर्म विभागाच्या स्वतंत्र वेबसाईटचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.  जिल्हा खनिज विभागाविषयीची अधिक माहिती WWW.DMFNAGPUR.IN या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.

ई समाधान प्रणालीचे उद्घाटन

            विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आणि जिल्हाधिकारी डॅा. विपीन इनटकर यांच्या हस्ते ई समाधान प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. व्हीएनआयटीसोबत मिळून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. प्रत्येक कार्यालयामध्ये ही प्रणाली बसविण्यात येणार येणार आहे. या माध्यमातून कार्यालयीन समन्वय साधत कामकाज सुकर होण्यास मदत होणार आहे

                                                                        *****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here