कोराडी येथील क्रिडांगणातून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडतील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
12

तिरंगा रॅलीद्वारे कोराडी येथे देशभक्तीचा जागर

नागपूर,दि. 15 :  क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळावी, त्यांना सरावासाठी चांगले क्रिडांगण मिळावेत, कुशल मार्गदर्शक मिळावेत यादृष्टीने आपण क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले आहे. यातूनच आपण अखिल भारतीय पातळीवर नावाजला जाईल व जागतिक पातळीवरची गुणवत्ता असेल अशा स्वरुपातील एक भक्कम क्रीडा संकुल मानकापूर येथे साकारले आहे. त्याच्या खालोखाल जिल्हा पातळीवरील क्रिडांगणाची गुणवत्ता व सेवासुविधा असलेले क्रिडांगण आपण कोराडीला साकारुन दाखविले आहे. येथील परिपूर्ण सुविधा खेळाडूंना त्यांच्या ध्येयापर्यंत घेऊन जातील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

कोराडी येथील तालुका क्रीडा संकुल सुविधांचे लोकार्पण व ‘घरोघरी तिरंगा’ अंतर्गत आयोजित भव्य तिरंगा रॅलीच्या सोहळयात ते बोलत होते. कोराडी येथील या तालुका क्रीडा संकुलाला वीरांगना राणी अवंतीबाई असे नामकरण या समारंभात करण्यात आले.

यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, बबनराव तायवाडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अमृत काळातील आपण तिसरा स्वातंत्र्य उत्सव साजरा करीत आहोत. या देशातील गोरगरीब, प्रत्येक जाती धर्मातील व्यक्तींच्या विकासाची संकल्पना आपण स्वीकारली आहे. हा अमृत महोत्सव आपण अधिक भक्कमपणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेच्या भक्कम पायावर साजरा करीत आहोत. आपल्या शेजारचे देश लडखडत असताना  आपली संयमी प्रगती आणि वाटचाल आपल्या राज्यघटनेने दिलेल्या मौलिक मूल्यांमुळेच सुरु असल्याचे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कोराडी येथील वीरांगना राणी अवंतीबाई तालुका क्रीडा संकुलात बॉक्सिंग, टेबल टेनिस, फेन्सिंग, कुस्ती, जिम्नॅस्टिक, बॅलन्सिंग बिम, ट्रायो ॲक्रोबॅटिक्स, रोमन रिंग, योगा आदी विविध प्रकारच्या खेळांच्या सुविधा उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here