जिल्ह्यातील सरिता कांबळे ठरल्या पहिला लाभार्थी
कोल्हापूर दि. 15 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया आज स्वातंत्र्य दिनी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील पात्र महिलांना 2 महिन्यांची रक्कम 3 हजार रुपये जमा करण्यास सुरुवात झाली असून उर्वरित पात्र महिलांना 17 ऑगस्ट पर्यंत लाभ वितरित होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोल्हापूर येथून या बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी एकनाथ कांळबांडे, महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे आदी अधिकारी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्था व अंगणवाडी सेवीका, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी सरिता कांबळे यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून त्यांचे आभार मानले. श्रीमती कांबळे यांनी आनंद व्यक्त करताना रक्षाबंधनाची भेट मला 3 दिवस आधीच मिळाली असे मत व्यक्त केले. महिलांचा सन्मान केल्याबद्दल आभार मानून कोल्हापूरी भाषेत ‘मला लयं भारी वाटतंय!…’ अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली. अंगणवाडी सेवीकेनी मला नारी शक्ती दूत ॲप द्वारे माहिती भरण्यास मदत केली असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी अनुराधा कुमठेकर यांनी मला व कुटुंबियांसाठी आर्थिक लाभ होणार असल्याने शासनाचे आभार मानले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून मिळणाऱ्या अनुभवाचा भविष्यात निश्चित फायदा होणार
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागात प्रशिक्षणासाठी रुजू झालेल्या मृणाली कांबळे यांनी प्रशिक्षण घेवून मला नोकरीसाठी मदत होईल. यातून मला प्रमाणपत्र मिळणार तर आहेच शिवाय सरकारी योजनेची माहितीही मिळणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना तसेच महिला व बाल विकास विभागाअतंर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती मिळाली या अनुभवाचा भविष्यात फायदाही होणार असल्याने शासनाचे तिने आभार मानले. यावेळी उपस्थित इतर लाभार्थी यांनी मिळालेल्या लाभाबद्दल शासनाचे आभार मानले.
0000000