भाविकांची गैरसोय होऊ न देता जोतिबा विकास आराखड्याची कामे करा -राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाच्या सुशोभीकरणाची कामे महिन्याभरात पूर्ण करा

कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : भाविकांची गैरसोय होऊ न देता जोतिबा विकास आराखड्याची कामे करा. ही कामे जलद गतीने करताना कामांचा दर्जा चांगला राहिल याची दक्षता घ्या, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखडा व लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या कामांबाबत मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 15 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला पुणे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, जोतिबा विकास आराखड्याची कामे करताना आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार करा. हा परिसर जैवविविधतेने नटलेला परिसर आहे. या परिसरात वृक्ष लागवड करा. मंदिर परिसरातून पाण्याचा निचरा व्यव‍स्थित होईल, याची दक्षता घ्या. तांत्रिक सल्ला घेवूनच सांडपाणी व्यवस्थापन करा. मंदिराचे कामकाज व दैनंदिन धार्मिक विधीला व्यत्यय न येता तातडीने कामे सुरु करा. मंदिर परिसरातील विद्युत व्यवस्था, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पार्किंग आदी विषयांचा आढावा घेवून स्वच्छतेच्या कामांसाठी दोन शिफ्टमध्ये काम करणारी यंत्रणा नेमा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाच्या कामाचा आढावा घेताना मंत्री श्री. देसाई म्हणाले, या स्मारकाच्या सुशोभीकरणाची कामे महिन्याभरात पूर्ण करा. या कामासाठी 99 लाखांचा निधी मंजूर झाला असून यापैकी 75 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे उर्वरित निधी तात्काळ वितरित करुन नियोजित  कामे जलद गतीने पूर्ण करुन लवकरात लवकर लोकार्पण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, श्री क्षेत्र जोतिबा परिसर संवर्धन प्राधिकरण विकास आराखड्याचा 1 हजार 816 कोटी रुपयांचा कमीत कमी बांधकाम व पर्यावरण पूरक बांधकामाचा समावेश असलेला सुधारित प्रस्ताव सादर केला आहे.

हा आराखडा करतेवेळी जैवविविधता जपणूक, वनीकरण, डोंगर माथ्याचे संवर्धन, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, नैसर्गिक जलस्रोत्र इ. गोष्टीचा विचार करण्यात आला आहे. या ठिकाणी असणाऱ्या नैसर्गिक जलसाठ्यांचा विकास करुन त्यांना पुनर्ज‍िवीत करण्यात येणार आहे. डोंगरमाथ्याचा नैसर्ग‍िक उत्तार, पाण्याचे स्त्रोत विचारात घेण्यात आले  आहेत. येथील बांधकामामध्ये कमीतकमी आरसीसी साहित्याचा वापर करण्यात येणार आहे. हा आराखडा तयार करताना यामध्ये जैवविविधता बगीचा, फुलपाखरु बगीचा, पक्षीतीर्थ, केदार विजय गार्डन, हत्ती कुरणे, प्राणी व पक्षी संग्रहालय, अपारंपरीक उर्जा स्रोतांचे माहिती केंद्र व संग्रहालय इ. पर्यावरण पूरक बाबींचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी यावेळी दिली.