मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरु राहणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

0
11

पात्र महिलांची नाव नोंदणी केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव; अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचतगटातील महिलांचा सन्मान

लातूर, दि. 16 : राज्य शासनाने गरजू महिला-भगिनींना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक पात्र महिलेला या योजनेचा लाभ मिळणार असून ही योजना कायमस्वरूपी अशीच सुरु राहणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज सांगितले. तसेच योजनेबाबत पसरविण्यात येणाऱ्या गैरसमजावर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची नावनोंदणी करणारे अधिकारी, यासाठी गावपातळीवर काम करणाऱ्या उदगीर, जळकोट तालुक्यातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बचतगटातील महिला आदी कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा आणि मार्गदर्शन मेळाव्यानिमित्त उदगीर तालुक्यातील कौळखेड येथील शिवम फंक्शन हॉल येथे आयोजित कार्यक्रमात ना. बनसोडे बोलत होते. यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर, जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी, उदगीरचे गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, जळकोटचे गट विकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, उदगीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिलांना दरमहा दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी अर्ज भरून घेण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका, आशा कार्यकर्ती, महिला बचतगटाच्या सीआरपी, अध्यक्ष आणि सदस्य महिलांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे उदगीर आणि जळकोट तालुक्यातील पात्र महिलांची मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नोंदणी झाली आहे. त्यामुळे नाव नोंदणीसाठी काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाची दखल घेवून त्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.

पात्र महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. उर्वरित पात्र महिलांच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा होणार आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या काही महिलांच्या अर्जात त्रुटी असल्याने ते अर्ज दुरुस्तीसाठी परत पाठविण्यात आले आहेत. तसेच काही महिलांच्या बँक खात्याला आधार क्रमांक जोडले नसल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा महिलांनी लवकरात लवकर आपल्या अर्जातील त्रुटींची दुरुस्ती करावी. ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार जोडलेले नाही, अशा महिलांनी आपल्या बँकेत जाऊन बँक खात्याला आधार क्रमांक जोडून घ्यावा, असे आवाहन ना. बनसोडे यांनी केले.

उदगीर येथे एमआयडीसी मंजूर करण्यात आली असून याठिकाणी मोठे उद्योग सुरु होवून युवकांसाठी रोजगार उपलब्ध होतील. तसेच तालुक्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाचे काम गेल्या पाच वर्षात करण्यात आले आहे. रस्त्याच्या विकासामुळे दळणवळण सुविधा गतिमान झाल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले.

यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी ना. बनसोडे यांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रकम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याबद्दल आभार मानले. ना. बनसोडे यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचतगटाच्या सीआरपी, अध्यक्ष आणि सदस्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी, अधिकारी आणि महिलांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here