निफाड तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न नाशिक, दिनांक : 18 ऑगस्ट 2024 (जिमाका वृत्तसेवा): समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सर्व विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.आज निफाड तालुक्यातील रूई, कोळगांव व खेडलेझुंगे येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ बोलत होते.
यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कराव शिंदे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी,शिवाजी सुपनर, डॉ.श्रीकांत आवारे, अशोक नागरे, आनंद घोटेकर, सरपंच सरला पवार, ऋषिकला घोटेकर, मायाताई सदाफळ उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, विकासाची प्रक्रिया ही न थांबणारी असून विकासाची कामे यापुढेही अविरत सुरू राहाणार आहेत. शासनाकडून सर्व घटकांचा विकास करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांना होण्यासाठी प्रचार प्रसार अधिक होण्याची आवश्यकता आहे. विकासाच्या प्रकियेत नागरिकांचा सहभागही तितकाच महत्वाचा आहे. येवला तालुक्यात २१ कोटींच्या निधीतून शिवसृष्टीचे काम प्रगतीपथावर आहे. पिंपळस ते येवला चौपदरी रस्त्याचे कॉंक्रीटीकरण कामासाठी ५६० कोटींचा निधी मंजूर आहे.लासलगाव विंचूर चौपदरी रस्ता व विंचूर ते खेडलेझुंगे रस्त्याचे कॉंक्रीटीकरण रूपये१३४ कोटी आणि लासलगाव बाह्य वळण रस्ता कामसाठी१०९ कोटींचा निधी मंजूर केला असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लासलगाव व येवला मधून ५१ हजार बहीणींचे योजनेसाठी फॉर्म भरले गेले होते. त्यातील ४७ हजार भगिनींच्या खात्यावर पैसे प्राप्त झालेले आहेत. उर्वरित त्रूटी असलेले अर्जातील त्रूटींची पूर्तता करण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू असून लवकरच त्यांच्याही खात्यावर पैसे येतील असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.
मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, विद्यार्थी युवकांना शासनाने कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून प्रति महिना रूपये १० हजार स्टायपेंड मिळणार आहे. मुलींनाही यापुढे शिक्षण मोफत मिळणार आहे तसेच मुलींसाठी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून ती १८ वर्षे वयाची होईपर्यंत १ लाख ५ हजार तिच्या खात्यावर शासनाकडून जमा केले जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने तीर्थाटन योजना लागू केली आहे व त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. त्यामुळे शासन निर्णयात नमूद केलेल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्याची संधी ज्येष्ठांना उपलब्ध होणार आहे अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.
मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, रुई हे गाव कायम स्वर्गीय खासदार श्री. शरद जोशी ह्यांच्या विचारांवर चालत आलं आहे..भिक नको हवे घामाचे दाम हे ब्रीदवाक्य स्विकारुण ह्या गावाने कायम आपल्या संघर्षांसाठी एकजुट दाखवली असल्याचे त्यांनी सांगितले.
रुई,ता.निफाड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
- रुई ते सांगवी रस्ता इजिमा-१७९ किमी ०/०० ते ५/०० ची सुधारणा करणे र.रु.६३ लक्ष
- अनुसूचित जाती वस्तीमध्ये रस्ता कॉक्रीटीकरण करणे.र.रु.१० लक्ष
- सभामंडप बांधणे र.रु.१५ लक्ष
- स्मशानभूमीचे बांधकाम करणे.र.रु.१५ लक्ष
- २५१५ मुलभूत सुविधा योजनेतील रुई ते कानळद रस्त्याची सुधारणा करणे र.रु.१५ लक्ष
रुई बाजारतळ काँक्रिटीकरण करणे – रु. 40.00 लक्ष
रुई येथे स्मशानभूमी अनुषंगिक काम – रु. 10.00 लक्ष
रुई येथील मारुती मंदिर परिसरात काँक्रिटीकरण- रु. 10.00 लक्ष
कोळगांव येथील विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
- ग्रामपंचायतीच्या जागेवर सभागृह बांधणे र.रु.१५ लाख
- अनुसूचित जाती वस्तीमध्ये रस्ता कॉक्रीटीकरण करणे र.रु.१० लाख
- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये संविधान सभागृह बांधणे र.रु.२० लाख
- स्मशानभुमी व घाट बांधणे.र.रु.१५ लाख
खेडलेझुंगे येथील या विकासकामांचे झाले भूमिपूजन व उद्घाटन
- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये संविधान सभागृह बांधणे.र.रु.२० लाख
- अनुसूचित जाती वस्तीमध्ये रस्ता कॉक्रीटीकरण करणे.र.रु.१० लाख
- तुकाराम बाबा मंदिराजवळ ग्रामपंचायतीच्या जागेवर सामाजिक सभागृह बांधणे.र.रु.१५ लाख
- तलाठी कार्यालय-निवासस्थान बांधणे.र.रु.३० लाख
- प्रादेशिक पर्यटन योजनेमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन.र.रुपये.१ कोटी
यामध्ये श्री.क्षेत्र खेडलेझुंगे वै.हभप.तुकाराम बाबा कुटिया व महादेव मंदिर येथे सभामंडप बांधणे २० लाख ,संतवन येथे काँक्रीटीकरण करणे २० लाख ,श्री हनुमान मंदिर,नवग्रह मंदिर व नक्षत्रवन येथे पेव्हर ब्लॉक बसविणे २० लाख ,संतवन व नक्षत्रवनात विद्युतीकरण व सुशोभिकरण १० लाख, खंडेराव मंदिर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे १० लाख, संतवनात येथे पेव्हर ब्लॉक बसविणे रूपये २० लाख