उद्योगांकरिता एमआयडीसीला अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षण करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
18

मुंबई, दि. १९ : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात विविध उद्योग समूह गुंतवणूक करीत आहेत. या उद्योगांना आवश्यक असणारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) मागणी विचारात घेऊन जलसंपदा विभागाने विविध प्रकल्पांमधील उपलब्ध पाण्याचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

उद्योगांकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांमधून अतिरिक्त पाणी मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. उद्योग मंत्री उदय सामंत, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात अनेक उद्योगसमूह गुंतवणूक करीत आहेत. या उद्योगांसाठी पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने पाण्याची उपलब्धता विचारात घेणे गरजेचे आहे. या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात विविध पाटबंधारे प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे सर्वेक्षण करून त्याचे नियोजन करावे.

उद्योगमंत्री श्री.सामंत यांनी विविध प्रकल्पांमधील उपलब्ध पाण्याचे सविस्तर सर्वेक्षण करून ते उच्चाधिकार समितीसमोर मांडण्याची त्याचप्रमाणे पाण्याचा प्रकल्पक्षेत्र निहाय वापर लक्षात घेऊन आरक्षणाबाबत व्यावहारिक निर्णय घेण्याची सूचना केली.

उद्योगांची भविष्यातील गरज लक्षात घेऊन बारवी, राजनाला बंधारा, पाताळगंगा, सूर्या, भातसा उपसा सिंचन आदी प्रकल्पांमधून अतिरिक्त पाणी मिळावे, अशी मागणी उद्योग विभागामार्फत यावेळी करण्यात आली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

00000

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here