कामगार हितासाठी बामणी प्रोटीन्स कंपनी लवकरात लवकर सुरू करावी – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची व्यवस्थापनाला सूचना

0
15

मुंबई, दि. २१ : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील बामणी प्रोटीन्स कंपनी कामगारांच्या हितासाठी सुरू होणे आवश्यक आहे. कामगारांनीही कंपनी व्यवस्थापनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबतीत राज्य शासन आणि स्थानिक जिल्हा प्रशासनही आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मंत्रालयात बामणी प्रोटीन्स कंपनीच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी बैठक घेतली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह बामणी प्रोटीन्स कंपनीचे संचालक प्रदीपकुमार,  व्यवस्थापक सतीश मिश्रा यांच्यासह कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, बामणी प्रोटीन्स कंपनी पुन्हा सुरू व्हावी, अशी तेथील कामगारांची मागणी आहे. त्यासाठी कामगार आवश्यक ते सहकार्य करायला तयार आहेत. अशावेळी कंपनीने सकारात्मक पुढाकार घेऊन कंपनी सुरू करण्यासाठी पावले उचलावीत. आवश्यक ते सहकार्य राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन करण्यास तयार आहे. जिल्ह्यातील रोजगार निर्मितीसाठी राज्य शासन पुढाकार घेत आहे. राज्यात अधिकाधिक गुंतवणुक व्हावी, रोजगार निर्माण व्हावा, ही भूमिका आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि कामगारांचे हित डोळ्यासमोर ठेवून कंपनी सुरू करण्यास प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने श्री. प्रदीपकुमार यांनी, प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन यासंदर्भात कंपनी संचालक मंडळास वस्तुस्थिती सांगून निश्चित लवकरात लवकर निर्णय घेऊ, असे सांगितले. कंपनी व्यवस्थापनाला आवश्यक ते सर्व सहकार्य  करण्याचे आश्वासन कामगार प्रतिनिधींनी यावेळी दिले.

00000

दीपक चव्हाण/वि.सं.अ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here