रेशनच्या धान्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यावर कायमस्वरूपी पैसे जमा होत राहणार – विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे

महिलांच्या सन्मान आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

नंदुरबार, दि. 24 ऑगस्ट : महिलांना समाजासह, कुटुंबात सन्मान मिळावा, त्यांचे अर्थकारण समृद्ध सक्षम व्हावे यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शासनाने  सुरू केली आहे. जसे वर्षानुवर्षे रेशनचे धान्य आपल्याला मिळत आहे, त्याचप्रमाणे लाडकी बहिण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यावर जमा होत राहतील, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

त्या जिल्ह्यातील सोयरापाडा ता. अक्कलकुवा येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या मेळाव्यात बोलत होत्या यावेळी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमशा पाडवी, राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगिता चव्हाण, जि.प.चे समाज कल्याण सभापती तथा सदस्य शंकर पाडवी,पंचक्रोशीतील सरपंच, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य लोकप्रतिनिधी तसेच महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, माझ्या कामाची सुरवात आदिवासी भागातील महिलांच्या प्रश्नातून झाली आहे.  महिलांमध्ये लक्ष्मी,दुर्गा, सरस्वती असते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, दहेली जलसिंचन प्रकल्पाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबीत होता. धरण झाले त्याच्यावर 422 कोटींचा खर्च करूनही त्याला कालवे नव्हेत, या कालव्यांना मान्यता देण्याचे काम या शासनाने केले आहे. या धरणामुळे 26 गावातली 3 हजार 200 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. येणाऱ्या काळात या आदिवासी भागातील महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी अक्कलकुवा उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती देणार असून खापर येथे चांगले तालुका रुग्णालय व्हावे यासाठीही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर  मोलगी येथेही उपजिल्हा रुग्णालय व्हावं यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या,जसे रेशन वर्षानुवर्षे मिळत आहे. तसे लाकडी बहिण योजनेचे पैसे देखील मिळत राहतील. त्यासाठी निवडणूकीत चांगली कामे करणारी माणसं निवडून देण्याची दबाबदारी नागरीकांची असते. पुढच्या सहा महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातले रस्ते चकाकण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगून त्या पुढे म्हणाल्या, बॅकामधली गर्दी पाहता बॅंकांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र रांगा करण्याच्या  व बॅकांमध्ये कामानिमित्त आलेल्या महिलांना बसण्यासाठी खुर्ची उपलब्ध करुन देण्यासाठी सूचना केल्या जातील. अशा रांगांमध्ये उभ्या असलेल्या महिलांसाठी स्वत:च्या निधीतून चहापाणी आणि नाश्त्यासाठी निलम गोऱ्हे  यांनी दोन लाखांचा निधी देत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी विधान परिषदेत काम करत असताना, आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी प्रश्न मांडत असताना आपल्याला उपसभापती मिलन गोऱ्हे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत असून त्यामुळे याभागातील अनेक योजनांना गती व न्याय मिळाला आहे.

यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना महिला, भगिनींना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

0000000000