मालवणमधील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला गती

0
7

दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तसेच नवीन पुतळा उभारण्यासाठी समित्या गठित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्या निरनिराळ्या मूर्तिकारांशी भेटीगाठी

मुंबई :- मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्याच ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाला गती दिली आहे. यासाठी त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी नुकत्याच काही शिल्पकारांच्या भेटीही घेतल्या आहेत.

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी काल वर्षा निवासस्थानी विशेष बैठक घेतली होती.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शिल्पकार विनय वाघ आणि शशिकांत वडके यांची मते देखील जाणून घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी सुतार त्यांच्याशी या विषयावर प्रदीर्घ चर्चा केली. यासोबतच अजूनही काही मूर्तिकारांची ते भेट घेणार असून त्यांचीही याबाबतची मते ते जाणून घेणार आहेत.

दरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर शासनाने दोन तांत्रिक समित्या स्थापन करण्याची अधिसूचना जाहीर केली आहे. यात झालेल्या दुर्घटनेची कारणमीमांसा करण्यासाठी पहिली समिती गठित केली असून, भारतीय नौदलाचा 20 वर्षांहून जास्त अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही पाच सदस्यीय समिती काम करेल. झालेल्या दुर्घटनेसाठी नक्की कोण जबाबदार आहेत याची जबाबदारी ही समिती निश्चित करेल. तर दुसरी समिती ही त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सौ. मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून, पुन्हा एकदा त्याच ठिकाणी पुतळा उभारण्याबाबतची कार्यपद्धती ही समिती निश्चित करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here