मांजरपाडा प्रकल्पातील पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याद्वारे आलेल्या पाण्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन संपन्न

0
12

पार खोऱ्यातील पश्चिमेकडे वाहून जाणारे ५०० मीटर पर्यंतच्या लेवलचे ५ टी.एम.सी. पाणी मांजरपाडा प्रकल्पात वळविणार – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक : 31 ऑगस्ट 2024 (जिमाका वृत्तसेवा): मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी आज येवल्यातील डोंगरगाव येथील साठवण तलावात प्रवाहित झाले आहे. येवलेवासियांना दिलेल्या शब्दाची स्वप्नपूर्ती झाल्याचा मनस्वी आंनद असून यापुढील काळातही पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही तसेच मांजरपाडा प्रकल्प केवळ पूर पाण्यावर थांबणार नसून पार-गोदावरी उपसा जोड योजना क्र. ३ व ४ च्यार माध्यमातून पार खोऱ्यातील पश्चिमेकडे वाहून जाणारे ५०० मीटर पर्यंतच्या लेवलचे ५ टी.एम.सी. पाणी लिफ्ट करुन ते मांजरपाडा मध्ये आणणार आहोत. हे पाणी पूणेगांव दरसवाडी मार्गे येवल्याला आणणार असून येवल्याची पाण्याची गरज भागून हे पाणी वैजापूर , संभाजीनगरला सुद्धा देणार आहोत असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज मांजरपाडा प्रकल्पातील पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे साठवण तलावात आलेल्या पाण्याचे जलपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, कार्यकारी अभियंता श्री मनोज ढोकचवळे, उपअभियंता श्री रितेश जाधव, माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ, अॅड. रविंद्र पगार, अंबादास बनकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सविता पवार,राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, अरुण थोरात, प्रेरणा बलकवडे, वसंतराव पवार, साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, ज्ञानेश्वर शेवाळे, डी. के. जगताप, हुसेन शेख, राजश्री पहिलवान, भाऊसाहेब बोचरे, मोहन शेलार, किसनराव धनगे,  संतु पा. झांबरे, डॉ. श्रीकांत आवारे, बाळासाहेब पिंपरकर, बाळासाहेब गुंड, दत्तुपंत डुकरे, दत्तकाका रायते, दिपक लोणारी, निसार शेख, राजेश भांडगे, अमजद शेख, मंगेश गवळी, प्रा. अर्जून कोकाटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


मंत्री छगन भुजबळ आपले मनोगतात म्हणाले, या योजनेचा DPR सुद्धा तयार झालेला आहे. मेरीच्या SLTAC कमिटीच्या  मान्यतेनंतर हा DPR शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.  आगामी काळात  दरसवाडी धरणाची क्षमता सुद्धा वाढविण्यास प्रयत्न करणार आहोत. पुणेगांवमध्ये आणखीनही कुठून पाणी शकते याबाबत जलसंपदा विभागाचे सचिव आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासोबत चर्चा झाली आहे. मांजरपाडा-गुगुळ या प्रवाही वळण योजना राबवून या वळण योजनांचे पाणी पुणेगांव मध्ये आणण्यांसाठी सर्वेक्षण करुन DPR तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, दुष्काळाच्या छायेत असलेल्या येवल्याला कुठल्याही परिस्थिती पाणी आणण्याचे असा निश्चय केला होता. आज अनेक अडचणींवर मात करत डोंगरगावमध्ये पाणी दाखल झालं असून दिलेला शब्द पूर्ण केला आहे. यापुढील काळातही अधिक आपले हे काम सुरू राहील.येवला तालुक्यातील प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी लवकरच उपलब्ध होईल. यासाठी अनेक योजना प्रगतीपथावर असून लवकरच या योजना पूर्ण होऊन पाणी उपलब्ध होईल असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला मतदारसंघात आपण हजारो कोटी रुपयांची विकास कामे केली आहे. आता पिंपळस ते येवला रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी ५६० कोटी रुपये मंजूर होऊन लवकरच काम सुरू होईल. राजापूरसह ४१ गाव पाणी पुरवठा योजनेसाठी १८८ कोटी, धुळगावसह १६ गावे पाणी पुरवठा योजनेसाठी ७३ कोटी, येवला शहरात ८८ कोटी रुपयांची कामे सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, २००६ साली झालेला कालवा २०१९ पर्यंत पडीक असल्याने अनेक अडचणी होत्या, कालव्याची दुरवस्था झालेली होती. यासंदर्भात तज्ज्ञ मंडळी व प्रशासनाची बैठक घेतल्यानंतर कालव्याचे नव्याने विस्तारीकरण व अस्तरीकरण करण्याची गरज समोर आली. दरसवाडी-डोंगरगाव कालव्याचे काँक्रीटीकरण व अस्तरीकरणासाठी २४२ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात आली. काम वेगाने होण्यासाठी कालव्यावर प्रत्येक २० किमी अंतरावर आधुनिक यंत्रांद्वारे काम हे काम सुरू होते. या अथक प्रयत्नानंतर दीड वर्षांची मुदत असलेले हे काम अवघ्या ६ महिन्यांत जवळपास ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले. मांजरपाडा पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरूवात झाली आहे बोगद्याद्वारे पुणेगाव धरणात आवक सुरू झाली. पुनेगाव व दरसवाडी धरण भरून पाणी येवल्याच्या हद्दीत दाखल झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. येवला तालुक्यातील पूर्व भागासोबतच चांदवड तालुक्याला देखील या पाण्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. यापुढेही विकासाची ही कामे अविरत सुरु राहतील असा विश्वास यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे, बाजार समितीच्या सभापती सविता पवार, लक्ष्मण कदम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मोहन शेलार यांनी तर सूत्रसंचालन प्रा.ज्ञानेश्वर दराडे यांनी केली.
कार्यक्रमामध्ये नांदूरमध्यमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मनोज ढोकचवळे आणि उपअभियंता श्री रितेश जाधव यांचा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here