दिव्यांगांच्या कल्याणासाठी शासन नेहमी तत्पर – पालकमंत्री अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर दि.२ (जिमाका)- कृत्रिम अवयव व अन्य सहसाधनांच्या सहाय्याने दिव्यांगांचे जगणे सुकर व्हावे यासाठी शासन सदैव प्रयत्नशिल असून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ दिव्यांगांपर्यंत पोहोचवून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास शासन तत्पर आहे,असे प्रतिपादन राज्याचे पणन,अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

फुलंब्री येथील पंचायत समितीत आज २०० हून अधिक दिव्यांगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व सहसाहित्याचे वाटप करण्यात आले. खासदार कल्याण काळे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, प्रांताधिकारी निलम बाफना आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच अलिम्को संस्थेचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की,  प्रत्येक पंचायत समिती कार्यक्षेत्रात या योजनेद्वारे दिव्यांगांना मदत देण्यात येईल. त्यासाठी यंत्रणेने दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना आवश्यक असलेल्या मदत साहित्याची मागणी नोंदवावी व त्यानुसार मदत देण्यात येईल. कुणीही दिव्यांग गरजू व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबदारदारी घ्यावी,असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. खासदार कल्याण काळे यांनीही यावेळी दिव्यांगांना प्रशासनाने तात्काळ मदत उपलब्ध करुन द्यावी,अशी सुचना केली.

०००००