२५ हजार शिबिरांच्या माध्यमातून सुमारे ४० लाख नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे लक्ष्य
मुंबई, दि. 02 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाअंतर्गत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयातून राज्यभर सामुदायिक आरोग्य शिबिरांचा जागर करण्यात येणार असून ही शिबिरे 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2024 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. राज्यात सर्वदूर आरोग्य सेवा पोहचविण्याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, निरामय सेवा फाऊंडेशन, धर्मादाय रुग्णालये यांचे सहकार्य या शिबिरांच्या आयोजनासाठी मिळणार आहे. या सामाजिक आरोग्य शिबिरामध्ये विविध धर्मादाय संस्था (NGOs), मेडिकल असोसिएशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्नित खाजगी वैद्यकीय महाविद्यालये व विद्यार्थी, महात्मा जोतिबा फुले जन – आरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत रुग्णालये, समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग असणार आहे.
सामाजिक आरोग्य शिबिरांचे आज प्रायोगिक तत्वावर घाटकोपर येथून उद्घाटन करण्यात आले. तसेच जळगाव, चंद्रपूर जिल्ह्यातील शिबिरांचे आयोजनही करण्यात आले. या शिबिरांमध्ये नागरिकांचे स्क्रिनींग करणे, रक्तांच्या तपासण्या, ई.सी.जी तपासण्या, आयुष्मान भारत (आभा कार्ड) योजनेचे कार्ड वाटप, आवश्यक औषधांचे वाटप, रोगाचे निदान झाल्यास रुग्णावर शासनाच्या आरोग्य विषयक योजनाच्या माध्यमातून उपचाराकरिता समन्वय करण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या आरोग्य विषयक विविध योजनांची माहितीही यावेळी देण्यात येणार आहे.
तपासण्यांमध्ये रोगाचे निदान झाल्यास आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया किंवा पुढील उपचारासाठी शासनाच्या धर्मादाय रुग्ण योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून मोफत उपचारासाठी समन्वय करण्यात येईल. शिबिरांमध्ये सर्व तपासण्या विनामूल्य असणार आहेत. ही शिबिरे सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 या वेळेत आयोजित होतील. एका सामुदायिक आरोग्य शिबिरात 100 ते 250 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच सुमारे 25 हजार शिबिरे व 40 लक्ष नागरीकांच्या तपासण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
निदान झालेल्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार धर्मादाय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, विविध शासकीय योजना यांच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार आहे. ही शिबिरे दलित वस्ती, आदिवासी पाडे, भटक्या जमातीच्या वस्त्या यांच्याजवळील शाळा, समाजमंदिर अशा सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. शिबिरामध्ये सुमारे 1500 रुग्णालयांचा समावेश राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांच्या वैद्यकीय कक्षाद्वारे देण्यात आली आहे.
0000
निलेश तायडे/विसंअ