एमटीडीसीचा आयसीआरटीच्या ‘जबाबदार पर्यटन पुरस्कारा’ने गौरव
मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ(MTDC) ला आयसीआरटी इंडिया आणि सबकॉन्टिनेंट अवॉर्ड्स 2024 द्वारे जबाबदार पर्यटनातील अनुकरणीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे. एमटीडीसीने ‘एम्प्लॉचिंग अँड अपस्किलिंग लोकल कम्युनिटीज’ श्रेणी अंतर्गत रौप्य पुरस्कार प्राप्त केला आहे. हे एमटीडीसीचे यश कौतुकास्पद असल्याचे मत पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
३१ ऑगस्ट २०२४ रोजी दिल्ली येथे उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज, आयसीआरटीचे (ICRT) इंटरनॅशनलचे संस्थापक आणि संचालक डॉ. हॅरोल्ड गुडविन यांच्या हस्ते तसेच केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या महासंचालक मुग्धा सिन्हा यांच्या उपस्थितीत एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी हा पुरस्कार स्विकारला.
या पुरस्काराबद्दल मंत्रालयात पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज यांनी एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले यावेळी पर्यटन संचालक बी.एन.पाटील, एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, पर्यटन विभागाचे सहसचिव श्री.रोकडे यावेळी उपस्थित होते.
स्थानिक कर्मचाऱ्यांना रोजगार आणि कौशल्य वाढवण्याची एमटीडीसीचे भूमिपुत्र धोरण स्थानिक समुदायांसाठी उपजीविका निर्माण करण्यासाठी प्रभावी ठरले आहे. एमटीडीसी ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांवर रिसॉट्स रेस्टॉरंट्स, बोट क्लब इ. कार्यरत आहेत आणि त्यातील बहुतांश कर्मचारी हे स्थानिक आहेत. एमटीडीसी नियमितपणे या कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण घेते. एमटीडीसी स्थानिक कला आणि हस्तशिल्पांच्या प्रसिद्धी व विक्रीस चालना मिळण्यासाठी विविध उपक्रम राबविते.
पर्यावरणपूरक पद्धती, स्थानिक प्रजातींची लागवड, समुद्रकिनारी स्वच्छता, सूक्ष्म प्लास्टिक प्लॉगिंग, वारसा संवर्धन इत्यादींसह अनेक उपक्रम एमटीडीसीद्वारे नियमितपणे राबवले जातात. अलीकडेच एमटीडीसीने एमटीडीसी रिसॉर्ट्समधील पर्यटकांना जागृत करण्यासाठी आणि त्यांचे उत्सर्जन कमी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कार्बन फुटप्रिंट कॅल्क्युलेटर देखील आणले आहे. एमटीडीसीने “रीथिंक टुरिझम पोस्ट पेंडेमिक इन महाराष्ट्रा” या नावाने जबाबदार पर्यटनावर स्वतःचा कार्यक्रम सुरू केला आहे. एमटीडीसी रिसॉर्ट्समध्ये पारंपारिक पर्यटनाकडून जबाबदार पर्यटनाकडे संक्रमण घडवून आणण्यासाठी एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल आणि पर्यटन अधिकारी मानसी कोठारे सतत प्रयत्नशील आहेत.
००००
संध्या गरवारे/विसंअ