जलजीवन मिशनबाबत आढावा बैठक
मुंबई दि.4:-सावंतवाडी तालुक्यातील 54 हजार 347 घरांना नळ जोडणी पूर्ण झाली असून 87 गावे ‘ हर घर नल से जल ‘ म्हणून घोषित करण्यात आली आहेत.246 पैकी 203 जलस्त्रोत जिओ टॅगिंग झाले आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री.पाटील व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संयुक्त बैठकीचे मंत्रालयात आयोजन केले होते. यावेळी बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, सहसचिव अमन मित्तल, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या आयुक्त परमित कौर, तालुक्यातील प्रतिनिधी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
शालेय शिक्षण मंत्री श्री केसरकर यांनी यावेळी सावंतवाडी तालुक्यातील पाणीपुरवठा योजनातील सुरू असलेल्या कामाबाबत माहिती घेतली.
जलजीवन मिशन अंतर्गत तिलारी प्रकल्पातून सावंतवाडी व संबंधित पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत प्रगतीपथावर व अंतिम टप्यात असलेल्या तिलारी प्रकल्पातून पाणी पुरवठा योजनेत कुंभार्ली, मळगाव, ब्रह्मणपाट व सावंतवाडी रेल्वे स्टेशनसाठी पाणीपुरवठा करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.
वेंगुर्ले शहराकरिता 1.६० दशलक्ष लीटर प्रतीदिन पाणी पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. तिलारी प्रकल्पावर पाणी पुरवठा योजनेतून चाचणी स्वरुपात पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे, असे यावेळी सांगितले. राज्य जलकृती आराखडा -२ मध्ये नारायण तलावाच्या पुनर्जीवन करण्यासाठी तरतूद केली आहे. वेंगुर्ले शहरासाठी वेगवर्धित पाणीपुरवठा योजनेत नारायण तलावाच्या बंधारा दुरुस्तीची तातडीची कामे करणे शक्य आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
00000
किरण वाघ/विसंअ