जगाचा ‘हॅपीनेस इंडेक्स’ वाढवण्याची कलावंतांमध्ये ताकद – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

0
9

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे मुंबईत थाटात वितरण

मुंबई, दि. ०४ : जगभरात आर्थिक क्षमता, विविध क्षेत्रातील प्रगती यावरून ‘ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स’ काढण्यात येतो. मात्र तरीही चिंता,  समस्या आहेतच. त्यामुळे जगात आता या इंडेक्स ऐवजी ‘हॅपिनेक्स इंडेक्स’ महत्त्वाचा आहे. हा इंडेक्स वाढविण्याची ताकद केवळ कलावंतांमध्येच आहे,असे गौरवोद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान सोहळ्यात काढले.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने देण्यात येणारे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव  पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार आणि राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान समारंभ आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला. कार्यक्रमात मंत्री श्री. मुनगुंटीवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे,  सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे, गोरेगाव चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की,  सर्व कलावंत आणि त्यांची कला ही अनेक पिढ्यांचे समाधान करत आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम या कलावंतांनी केले आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देण्याची प्रथा, परंपरा आहे. आपला देश संस्कृतीप्रधान आहे, एखाद्याच्या योगदानाचं मनापासून कौतुक करणं, त्याला दाद देणं यासाठी विशाल हृदय लागतं. महाराष्ट्र शासनाने ही सहृदयता जपली आहे. आपल्या मराठी माणसाचं आपण कौतुक करणं यापेक्षा मोठा आनंद नाही. प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या कामासाठी मान्यता आणि कृतज्ञता दर्शविणारा हा सोहळा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अभिनय, लेखन, किर्तन, प्रवचन, नृत्य, दिग्दर्शन या विविधागी कलांनी आपला महाराष्ट्र नटलेला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला ऐतिहासिक आणि गौरवशाली परंपरा आहे.समर्पित भावनेने काम करणाऱ्या वृद्ध कलावंतांना राज्य शासन मदत करते त्यासाठी असणारी वयोमर्यादा आपण ५० वर्ष इतकी ठेवली. ही वयोमर्यादा ठेवणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. या वृध्द कलावंतांचा सन्मान निधी सरसकट पाच हजार रुपये करण्यात आला आहे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुनगंटीवार  म्हणाले, राज्यात ७५ चित्र नाट्य मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात बदल करण्यात येत आहे. राज्यामध्ये चित्रपटांना चित्रीकरणासाठीची लागणारी परवानगी एक खिडकी योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. तसेच बालनाट्य सृष्टीच्या विस्तारीकरणासाठी सरकार कार्य करीत आहे.  त्यासाठी येणाऱ्या सूचनांचे स्वागत करून त्याची यथोचित अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

यावेळी प्रधान सचिव श्री. खारगे म्हणाले की, महाराष्ट्राच्या कला संस्कृतीच जतन आणि संवर्धन करणाऱ्यांचा हा सन्मान आहे. विविध परंपरेने, संस्कृतीने नटलेला असा हा आपला महाराष्ट्र आहे. कलाकारांमुळे ही संस्कृती टिकली आहे. कलांवतांचा संपूर्ण मदत करण्याचे काम शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. पुरस्कारासाठीची  रक्कम दुप्पट व तिप्पट करण्यात आली आहे.

 

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध पुरस्कारार्थीना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रकमेचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.

सन २०२४ साठीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह. भ. प. संजय महाराज पाचपोर यांना,  भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार सन २०२४ आरती अंकलीकर, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सन २०२४ ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश बुध्दीसागर,  संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सन २०२४ शुभदा दादरकर, तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार सन २०२३ चा शशिकला झुंबर सुक्रे यांना घरी जाऊन नंतर देण्यात येणार आहे. तर सन २०२४ पुरस्कार जनार्दन वायदंडे यांना प्रदान करण्यात आला.

तसेच २०२४ साठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कारही या समारंभात प्रदान करण्यात आले. राज्य सांस्कृतिक पुरस्कार मानकऱ्यांमध्ये विशाखा सुभेदार (नाटक), डॉ. विकास कशाळकर  (उपशास्त्रीय संगीत), अभिमन्यू धर्माजी सावदेकर  (लोककला), शाहीर राजेंद्र कांबळे (शाहिरी),  सोनिया परचुरे (नृत्य),  संजय नाना धोंडगे (किर्तन /समाजप्रबोधन), पांडुरंग मुखडे (वाद्यसंगीत), नागेश सुर्वे (कलादान), कैलास मारुती सावंत (तमाशा) आणि शिवराम शंकर घुटे (आदिवासी गिरीजन) यांना गौरवण्यात आले.

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या कलाविष्काराचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात अजित परब, संज्योती जगदाळे, केतकी भावे – जोशी, अरुण कदम, श्याम राजपूत, भार्गवी चिरमुले, विकास पाटील, शाहीर शुभम विभुते यांच्यामार्फत सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य संचालक श्री. चवरे यांनी केले.

0000

निलेश तायडे/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here