पाटण तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण कामाच्या प्रगतीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा 

सातारा, दि. 10 (जि.मा.का.) :   पाटण मतदार संघातील विविध विकास कामांचे भूमीपुजन व विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. या कामांचा प्रगतीचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला  जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षम समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे आदी उपस्थित होते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र वाटोळे या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमीपुजन तसेच तारळी प्रकल्पाच्या 5 उपसासिंचन योजना 50 मीटर उंचीपर्यंत मंजूर होत्या. त्या योजनाही पूर्ण क्षेमतेने  कार्य करीत नव्हत्या. गेली 4 वर्ष प्रयत्न करुन पालकमंत्री श्री. देसाई यांनी या योजना 100 मीटर पर्यंत उचलून त्यातून सिंचन व्हावे यासाठी प्रयत्न केले आहेत व कामे पूर्ण करून घेतली आहेत. या योजनांमधून पाणी सोडण्याचा शुभारंभ देखील मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे . मोरणा-गुरेघर प्रकल्पामध्ये उजवा आणि डावा तिर कालावा प्रस्तावित होता.  त्यावर बंदिस्त पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ, नाटोशी उपसासिंचन योजना अंतर्गत जे क्षेत्र ओलिताखाली येत नाही असे 650 एकर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे या कामाचे भूमीपूजन, लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी प्रशिक्षण संकुल, काळोली  येथील पहिल्या टप्प्यातील इमारतीचे काम पूर्ण झाले आहे याचे उद्घाटन, गेल्या 10 वर्षापासून प्रलंबीत असलेले पाटण नगर पंचायतीची नळ पाणी पुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 22 कोटींचा निधी मंजूर केला या कामाचे भूमिपुजन करण्यात येणार आहे. तसेच पाटण तालुक्यातील प्रथमच उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले. या अनुषंगाने जी कामे अपूर्ण आहेत ती तातडीने पूर्ण करावीत अशा सूचनाही त्यांनी यंत्रणांना दिल्या.