वैद्यकीय शिक्षण, संशोधन व ‘आयुष’च्या आयुक्तांचे स्पष्टीकरण
मुंबई, दि.१२ :- शासकीय/महानगरपालिका/अनुदानित/खाजगी विनाअनुदानित आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे हमीपत्र लिहून घेण्याबाबत निर्देश देण्यात आले नसल्याचे वैद्यकीय शिक्षण, संशोधन व ‘आयुष’च्या आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या तसेच, विहित मार्गाने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या एससी, एसटी ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना १०० टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्यांचेकडून प्रवेशाच्यावेळी कोणतेही शिक्षण शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहे.
ज्या विद्यार्थ्यांना ५० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्यांचेकडून फक्त ५० टक्के शिक्षण शुल्क घेऊन, त्यांना प्रवेश देण्यात यावा. शैक्षणिक संस्थांनी योजनेबाबतची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देऊन संबंधित योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याबाबत कळवावे. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याकरिता प्रयत्न करावेत. प्रथम वर्षाशिवाय इतर पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीकरिता पात्र असतील तर त्यांच्याबाबतही याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, असे संचालनालयामार्फत निर्देश देण्यात आले असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने कळविले आहे.
000000
राजू धोत्रे/विसंअ